बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी वरणगाव नगराध्यक्षांची दीपनगर प्रकल्पात धडक

0

प्रदूषणाचा मनस्ताप वरणगावकरांना तर नोकरीचा लाभ परप्रातीयांना मिळू देणार नसल्याचे सुनील काळेंनी ठणकावले

भुसावळ :तालुक्यातील वरणगाव शहरातील सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या हक्कासाठी नगराध्यक्ष सुनील यांनी मुख्य अभियंता कार्यालय समोर बुधवारी ठिय्या मांडला. वरणगाव शहरावर दीपनगर वीज निर्मिती केंद्राने प्रदूषण लादायचे आणि रोजगार मात्र वरणगावच्या बाहेरच्यांना द्यायचा हे चालणार नसल्याचे नगराध्यक्षांनी अधिकार्‍यांना ठणकावून सांगितले. वरणगाव शहरातील तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या मागणीसाठी वरणगावातील शेकडो तरुणांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात दीपनगर प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांच्या कार्यालयासमोर बुधवारी तास ठिय्या आंदोलन केले.

टप्प्याटप्प्याने रोजगाराची ग्वाही
मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, साजीद कुरेशी, शामराव धनगर, शहराध्यक्ष भाजपा सुनील माळी, रमेश पालवे, आकाश निमकर, सचिन मेथळकर, किरण धुंदे, नटराज चौधरी, ईरफान भाई पिंजारी, लखन माळी यांच्यासह वरणगाव शहरातील शेकडो तरुण उपस्थित होते.
मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्यांना मिटींग हॉलमध्ये बोलावत समस्या जाणल्या. भेलचे अधिकारी, पॉवर मॅकचे अधिकारी यांना बोलावत उपस्थित बेरोजगार मुलांना टप्या-टप्प्याने रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन विवेक रोकडे व मुख्य अभियंता पंकज सपाटे यानी दिले.

वरणगावकरांवर अन्याय होणार नाही
प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील तरुणांच्या हाताला काम द्या, सीएसआर निधीतून वरणगाव शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी भरीव निधी द्या, ओझरखेडा धरणातून दीपनगर वीजनिर्मिती केंद्रासाठी पाण्याची पाईप लाईन वरणगाव शहरातून भोगावती नदी पात्रातून टाकण्यात आल्याने तेथे मोठा व्हॉल्व्ह ठेवण्याची मागणी केली.
यावेळी मुख्य अभियंता पंकज सपाटे व विवेक रोकडे यानी तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी टप्या टप्याने रोजगार देण्याचे ठोस अश्वासन दिले तसेच सीएसआरचा निधी सुद्धा देण्याबाबत प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. वरणगावकारांवर अन्याय होणार नाही यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आश्‍वासन उभय अधिकार्‍यांनी दिले.