बोदवडला तालुका सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन

0

बोदवड – तालुक्यातील सरपंच संघटनेतर्फे बुधवार, 22 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीकडून पंतप्रधान आवास योजनेचे ठराव स्थानिक पंचायत समिती प्रशासनाला पाठविण्यात आले परंतु तीन ते चार वर्षे अगोदर पाठवलेल्या ठरावावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे आणि स्थानिक सरपंच ग्रामसेवक यांनी याबाबत पंचायत समितीला संपर्क साधून पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्याबाबत मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली न गेल्याने तालुक्यातील सरपंच संघटनेने आक्रमक होत आज एक दिवसीय धरणे आंदोलन केले.

यांचा धरणे आंदोलनात सहभाग
तालुक्यातील घरकुल ‘ब’ यादी पुर्ण झालेली असून पंचायत समिती स्तरावर ‘ड’ ची यादी संपुर्ण कागदपत्रांची पूर्तता करून ग्रामसभेचा ठराव आँनलाईन केलेली आहे त्यामुळे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ‘ड’ यादीतील घरकुल लाभार्थींची घरकुले तात्काळ सुरू करण्यात यावेत या मागणीसाठी तालुक्यातील सर्वचं सरपंच यांनी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनात पवित्रा घेतला होता.
यावेळी धरणे आंदोलनात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष (बंडू)पाटील, कार्याध्यक्ष सतिष पाटील, सरपंच परीरषद महिला तालुकाध्यक्ष नर्मदाबाई गोविंदा ढोले, भानखेडा सरपंच अशोक शांताराम पाटील, विचवा सरपंच जितू तायडे, एणगाव सरपंच अन्नपूर्णा विनोद कोळी यांच्यासह तालुक्यातील सर्वचं सरपंच सहभागी झाले .