बोदवड शहरामध्ये आशा सेविकाकडून जनजागृती व तपासणी मोहिम

3

बोदवड : जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असलेतरी बोदवड तालुका मात्र अद्यापही सेफ झोनमध्ये आहे. असे असलेतरी खबरदारी म्हणून आशा सेविका शहरामध्ये जनजागृती करून तपासणी मोहिम राबवत आहेत. आजपर्यंत शहरात 15 हजार नागरीकांची तपासणी करण्यात आली असून त्यात गटप्रवर्तक लता वाघचौरे, आशा सेविका ललिता मराठे, अरुणा कराड, मंगला बिल्लोरे, संध्या सोनवणे, योगीता वाणी, सुनंदा माळी, छाया तायडे या आशा सेविका घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात तपासणी मोहिम राबवून योग्य ती खबरदारी घेण्याचे व प्रशासकीय नियमांचे पालन करावयाचे आवाहन करीत आहेत.

नागरीकांना माहिती देण्याचे आवाहन
कोरोना विषाणूमुक्त बोदवड होण्यासाठी एक पाऊल आशा सेविका उचलत असून बोदवडकरांच्या सुरक्षतेसाठी आशा सेविका मेहनत घेत आहेत. शहरामध्ये काही भागात आशा सेविका व गटप्रवर्तक तपासणीसाठी गेले असता शहरातील काही लोक तपासणी करू देत नसल्याने तसेच माहिती लपवली जात असल्याचे आशा सेविकांकडून सांगितले जात आहे. नागरीकांनी तपासणी मोहिम यशस्वी पार पाडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे, असे आशा गटप्रवर्तक व आशा सेविकांकडून सांगण्यात येत आहे.