बोलता न येणारा 4 वर्षीय बेपत्ता बालक सुखरुप पालकांच्या स्वाधीन

0

जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या 24 तासात शोधून काढले कुटूंबिय ; बाल निरिक्षण गृहात केले होेते दाखल

जळगाव – एकटा रिंगरोड परिसरात फिरतांना एक चार वर्षीय बालक नागरिकांना आढळून आला. त्याला बोलता येत नव्हते, तो जे बोलत होता, ते नागरिकांना कळत नव्हते, वर्णनावरुन हा बालक बाहेरील राज्यातील असावा, असे समजून त्याला माणुसकी दाखवित नागरिकांनी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले होते. गुरुवारी दिवसभर या बालकाला सांभाळतांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील होमगार्ड महिला तसेच गुन्हे शोध विभागातील कर्मचार्‍यांची चांगलीच कसरत झाली. पोलीस हेड कॉस्टेबल दिलीप सोनार यांनी अवघ्या 24 तासात या बालकाच्या कुटुंबियांचा शोध घेवून त्याला स्वाधीन केले होते. मुलगा सुखरुप मिळाल्याने वडीलांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. विनोद उत्तम भिल वय 4 वर्ष रा. भिलवाडा, पिंप्राळा असे बालकाचे नाव आहे.

पिंप्राळा रेल्वे गेटवर सापडला
पिंप्राळा रेल्वेगेट जवळील रस्त्यावर गुरुवारी दुपारी 3.30 वाजता 4 वर्षाचा बालक एकटा फिरत होता. दरम्यान रस्त्यावरुन रविंद्र गोपाळ सोनवणे रा. विठ्ठलपेठ हे कामावर जात होते. त्याचे या या बालकाकडे लक्ष गेले. त्यांनी त्याची विचारपूस केली असता, त्याचे बोलणे समजत नव्हते. याचवेळी याठिकाणी डॉ. वसंत बापुराव देशमुख रा. दत्त कॉलनी, शाहूनगर व मोहम्मद नूर अब्दल गफ्फार मणीयार हे आले. नातेवाईकांचा शोध घेतला मिळून आले नाही. हा बालक एकटा असून तो बेपत्ता झाला असावा, असे समजून सोनवणे यांच्यासह दोघा नागरिकांनी या बालकाला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.

होमगार्डसह कर्मचार्‍यांची सांभाळतांना कसरत
बोलता न येणार्‍या या बालकाला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला होमगार्ड त्याला सांभाळत होत्या. बालक एका ठिकाणी न बसता पळून जात होता. पळाल्यानंतर गुन्हे शोध पथकातील नाना तायडे, अरविंद देवरे यांच्यावर गाडीवर बसवून त्याला हातवारे करुन बाहेर नेण्यास सांगायचा. त्याला कर्मचार्‍यांनी दुचाकीवरुन फिरवूनही आणले. दिवसभर या बालकाने कर्मचार्‍यांचे मनोरंजनही केले मात्र त्याला सांभाळतांनाही होमगार्डसह कर्मचार्‍यांची चांगलीच कसरत झाली. सायंकाळपर्यंत कुणीही कुटुंबियाचा शोध न लागल्याने या बालकाला हेड कॉन्स्टेबल दिलीप सोनार यांनी बाल निरिक्षण गृहात दाखल केले. याठिकाणी त्याबाबतचे पत्रही त्यांनी अधीक्षकांना दिले.

अन् हॉटेल मालकामुळे गवसले कुटुंबिय
पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप सोनार यांनी बालकाबाबत पिंप्राळा स्टॉपवर रविंद्र राजाराम कोळी यांना माहिती दिली. छायाचित्र पाहिल्यावर कोळी यांनी त्याची ओळख पटविली. विनोद उत्तम भिल असे त्याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार कोळी यांनी विनोदच्या वडील उत्तम शंकर भिल या सोबत घेत जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. खेळता खेळता विनोद एकटाच निघून गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी बालनिरिक्षण गृहातून विनोदला ताब्यात घेवून त्याचे वडील उत्तम भिल यांच्या स्वाधीन केले. उत्तम भिल हे मजुरी करतात. त्यांची पत्नी सुनीता ही वेडसर असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारपासून बेपत्ता विनोद सुरक्षित व सुखरुप मिळाल्यानंतर वडील उत्तम भिल यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी पोलिसांसह रविंद्र कोळी यांचे आभार मानले.