बोली भाषेत साहित्य निर्मिती अधिक महत्त्वाची

0

प्रा. डॉ. राम नेमाडे यांचे प्रतिपादन

। जळगाव प्रतिनिधी ।

बोली भाषेच्या प्रादेशिक विस्तारापेक्षा त्यातील साहित्य निर्मिती अधिक महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. राम नेमाडे यांनी केले. ते सरदार वल्लभभाई पटेल लेवाभवन येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय लेवा गणबोली साहित्य संमेलन अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आम्ही येथे जमलेलो आहोत ते एका भाषेच्या गुणगौरवासाठी. मात्र एका भाषेचा गौरव करीत असताना आम्ही कधीही दुसर्‍या भाषेचा द्वेष केला नाही. इतर कोणी करीत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्‍न. मात्र आम्हाला भाषा भगिनींमध्ये वाद घालायचा नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील, कोल्हापूर येथील कादंबरीकार डॉ. राजन गवस , पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. मनोहर जाधव , हैद्राबाद येथील गुगलचे इंजिनियर आशिष चौधरी,जेष्ठ लेखिका डॉ. आशालता कांबळे, डॉ. अरविंद नारखेडे, डॉ. नि. रा. पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील ,महापौर सीमा भोळे, माजी महापौर विष्णु भंगाळे, तुषार वाघुळदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी संमेलन व्हावे
प्रा. डॉ. नेमाडे पुढे म्हणाले की, खान्देशात अनेक बोली भाषा आहे. अनेक मोठ मोठे साहित्यिक झाले आहे. कोणती भाषा किती अंतरावर व किती विस्ताराने बोलली जाते याला महत्व नाही तर ज्यांची साहित्यकृती किती समर्थ आहे याला महत्व देतो. दर वर्षी ही संमेलने व्हायला हवी, वर्षानुवर्ष ही संमेलन होत राहतील. महाराष्ट्राच्या कोपर्‍या कोपर्‍यातून लोक आलेले आहेत. रत्न आहेत, अशा रत्नांची या भाषेला सन्मान केला आहे.

बोलीतून समाजाचे चित्रण – गवस
राजन गवस यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रत्येक समाजाची बोली त्या समाजाची संस्कृती असते. समाजाचे जगणे घेवून येत असते. हे लेवा बोलीचे संमेलन आहे समाजाचे संमेलन नाही. आज भाषा साक्षर करणे गरजे आहे. कोणतीही भाषा शुद्ध अशुद्ध नसते. भाषा ही भाषा असते. शुध्द लेखनाच्या नियमांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील मुलांचा घात केला आहे. माझी बोली अशुध्द असल्याचा न्युनगंड त्यांच्यात आला आहे. पुण्याच्या भाषेला प्रमाण भाषा स्वीकारावे तर बोलीभाषा देखील स्वीकारली जावी. बोलीतून समाजाचे चित्रण असते. यापुढे भाषा साक्षरतेचे संमेलन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठी संपन्न होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बोली संपन्न होणे गरजेचे आहे. त्याच सुरूवात जळगाव येथे होत असल्याचे गौरवोउद्गार गवस यांनी काढले.
अहिराणी, लेवा भाषेबाबतचा गैरसमज दूर करा- कुलगुरू डॉ. पाटील
साहित्य संमेलनाच्या सात महिन्यांपूर्वीच विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामकरण झाले आहे. माझ्या कारकिर्दीत हे नामकरण होते हे मला महत्वाचे वाटते असे मत कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ.पाटील पुढे म्हणाले की, शाळेत न गेलेल्या एका कवयित्रिचे नाव एका विद्यापीठाला देण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. बहिणाबाईंच्या सर्व कविता या सर्व लेवा गणाबोलीतून आहे. लेवा गणाबोलीत गोडवा, नाद व लहेजा आहे. अहिराणी व लेवा गणबोली ही एकच असल्याचे सांगितले जाते मात्र, तसे नाही. या भाषांमध्ये फरक आहे व हा फरक हा गैरसमज दूर करण्याचे काम साहित्यिकांना करावे लागणार आहे. आता लेवा गणबोली जीवंत ठेवण्याचे मोठे आव्हन निर्माण झालेले आहे. मानव जीवनात भाषा, साहित्य व कला हे घटक अत्यंत महत्वाचे असतात. विद्यापीठात नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी अभ्यास संशोधन केंद्रास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. यात विविधांगी भाषेचा अभ्यास करता येणार आहे. या भाषेवर संशोधन करता येणार आहे.
संमेलनाध्यक्षाचा परिचय
मुळ नाडगाव(बोदवड)चे रहिवाशी सध्या डोंबिवली येथे स्थायीक झालेले प्रा. डॉ. राम नेमाडे हे प्रथम लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. नेमाडे यांचा जन्म शेतकरी मजूर कुटूंबात झाला. त्यांनी 11वी नंतरचे सर्व शिक्षण बाहेर केले आहे. ते एमए बीएड झाले आहेत. 1961 पासून नोकरीला सुरूवात केली. तसेच राजेश स्टडी सेंटरच्या माध्यमातून त्यांनी 15 वर्ष गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार केले आहेत. यांनी फार गरीबीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत विविध जिल्ह्यांमध्ये विद्या ज्ञानाचे कार्य करत वांद्रा येथे चेतना कॉलेजमध्ये मराठी-हिंदी भाषेचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यांनी मराठी-हिंदी व्याकरण लेखन, चार कविता संग्रह प्रकाशित झाले आहे. यात ऋतुगंध, हिरवा चाफा, अभंग वारीचे-दुनीयादारीचे, माही लेवा गण बोली अन् इतर कविता यांचा समावेश आहे. आपल्या गरीबीची जाणीव ठेवत त्यांनी सामाजिक संस्थांना व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे. नवोदित साहित्यांना त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. सुमारे 50 वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत खान्देश सेनेतर्फे शिक्षणमहर्षी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासोबत इंडो-थाय फोरमतर्फे प्राइड ऑफ नेशन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मुलांनी जिद्दीने पुढे गेले पाहिजे. परिस्थितीला घाबरू नये. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे प्रयत्न केले पाहिजे. गरीबीही आपल्या मार्गातील धोंड मानू नये तर पुढे जाण्याची प्रेरक शक्ती आहे.
पुस्तकांचे प्रकाशन
दरम्यान, संमेलनामध्ये डॉ. अरविंद नारखेडे, श्रीराम अत्तरदे, कै.निळकंठ महाजन, प्रा. व.पु.होले डॉ. काशिनाथ बर्‍हाटे ,विनोद इंगळे ,पुणे श.मु.चौधरी, विनोद इंगळे , प्रा.संध्या महाजन ,डॉ. राम नेमाडे , डी. एन. पाटील ,नीलकंठ महाजन ,संजय पाटील , श. मु.चौधरी यांच्यासह अनेक लेखकांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर बोलीभाषक डॉ. हरिश्चंद्र बोरकर(झाडी बोली), शाम मोरे (मालवाणी बोली), रमेश सुर्यवंशी (अहिराणी बोली), रवींद्र पांढरे (जामनेरी बोली), डॉ. पुष्पा गावीत (आदिवासी बोली), मारोती तिरटकर (झाडी बोली) यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. संध्या महाजन, प्रणिता झांबरे यांनी तर आभार प्रकाश पाटील यांनी मानले.
उद्घाटन सत्रानंतर परिसंवदाचे आयोजन करण्यात आले होते. लेखकांचे मनोगत, लेवा गणबोली कथाकथन, नाट्यछटा, लेवा गणबोली कवीसंमेलन, मराठी कवीसंमेलन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.