बोहल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवासह चुलत भावाचा मृत्यू

0

नशिराबादजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; सावदा शहरात शोककळा

भुसावळ- सावद्याकडे दुचाकीने निघालेल्या दोघा चुलतभावांच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नशिराबादजवळील ओरीएंट फॅक्टरीजवळ शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने सावदा शहरात शोककळा पसरली आहे. हेमंत उर्फ आकाश जीवन भिरूड (27) व त्याचा चुलत भाऊ वैभव विजय भिरूड (20, दोघेही रा.सावदा) अशी मयताची नावे आहेत. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला तर अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

लग्नापूर्वीच मृत्यूने गाठले
सावद्यातील रहिवासी व मध्य रेल्वेत नोकरीस असलेल्या हेमंत उर्फ आकाश भिरूडचा नुकताच साखरपुडा तपतकठोरा येथे झाला होता तर पुढच्या महिन्यात 20 एप्रिल रोजी त्याचा विवाह सावद्यात होणार होता. लग्नासाठी घरात लगबग सुरू असतानाच दोघे चुलत भाऊ लग्नाचा सामान खरेदीसाठी दुचाकी (एम.एच.19 बी.टी. 2001) ने जळगाव येथे गेले होते. परतीच्या प्रवासात नशिराबादजवळील ओरीएंट फॅक्टरीजवळ भरधाव ट्रक (एम.एच.19 जे.वाय.1931) ने धडक दिल्याने दोघे भाऊ जागीच ठार झाले. मयत हेमंत हा व्यापारी जीवन भिरूड यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील, आई, आजोबा, आजी, बहीण असा परीवार आहे तर वैभव हा जीवन भिरूड यांचे लहान भाऊ विजय उर्फ दत्तू भिरुड (रा.वापी) यांचा मुलगा होय. अपघातास कारणीभूत असलेला ट्रक नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.