‘भक्ती-शक्ती’ शिवतिर्थ मैदानावर ‘सार्वजनिक शिवजन्मोत्सवा’चे आयोजन

0

छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्वात विविध कार्यक्रमाची पर्वणी

पिंपरी ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने अखिल पिंपरी चिंचवड शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सवात साजरा करण्यात येत आहे. भक्ती-शक्ती समूह शिल्पाच्या शिवतिर्थ मैदानावर 16 ते 19 फेब्रुवारीपर्यंत व्याख्यानमाला, मर्दानीखेळ, महानाट्य अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सार्वजनिक शिवजन्मोत्सवाचे उद्घाटन रविवारी (दि.16) सायंकाळी 6 वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले व तानाजी मालुसरे यांचे वंशज डॉ. शितल मालुसरे यांचे हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अजित पवार, महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमर साबळे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी सभापती विलास मडेगिरी, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डिकर आदी उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी 7 वाजता शिवछत्रपती मालिका फेम शिवशाहीर सुरेश सुर्यवंशी यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे.

असे असतील कार्यक्रम…

सोमवारी (दि.17) सायंकाळी 7 वाजता नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (दि.18) सायंकाळी 6 वाजता मराठ्यांची गौरवगाथा एक महानाट्य आयोजित केले असून गड-किल्ले संवर्धन करणा-या सामाजिक संस्थानचा सन्मान सोहळा होणार आहे. बुधवार (दि.19) सकाळी 6 वाजता लालमहाल पुणे ते भक्ती-शक्ती उद्यान निगडी असा पायी शिवज्योत सोहळा होणार आहे. सकाळी 9 वाजता सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा व मिरवणूकीचे आयोजन केले आहे. त्यात वारकरी,ढोलताशा पथक, मर्दानी खेळ हे आकर्षण असणार आहे. तसेच शिवसप्ताह शाळेतील स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता मराठ्यांची गौरवगाथा एक महानाट्य (प्रयोग दुसरा) आयोजित केला आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यक्रमात सहभागी होवून विविध कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.