भरधाव अ‍ॅपे रीक्षा उलटली ; महिला ठार ; चार प्रवासी जखमी

0

चाळीसगाव-मालेगाव रोडवर अपघात ; अपघातानंतर चालकाने वाहनासह काढला पळ

चाळीसगाव- चाळीसगावकडून मालेगावकडे प्रवासी घेवून जाणारी अ‍ॅपे रीक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने 2 रोजी दुपारी चार वाजता तालुक्यातील बिलाखेड शिवारातील टोलनाक्याच्या पुढे रस्त्यावर रीक्षा पलटी झाल्याने 60 वर्षीय वृद्धा ठार झाली तर चार प्रवासी जखमी झाले. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात रीक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगावकडून मालेगावकडे प्रवासी घेवून जाणार्‍या अ‍ॅपे रीक्षा चालकाने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने रीक्षा चाळीसगाव-मालेगाव रोडवरील तालुक्यातील बिलाखेड शिवारात टोल नाक्याच्या पुढे रस्त्यावर पलटी झाल्याने 4 प्रवासी गंभीर झाले होते. त्यात लक्ष्मीबाई बाळु गवळी (60, रा.बळीरामपेठ शनिपेठ, जळगाव) या गंभीर जखमी झाल्या होत्या. रीक्षा पलटी झाल्यानंतर चालकाने लागलीच रीक्षा सरळ करुन मी तुमच्या साठी रुग्णवाहिका आणतो व तुम्हाला खर्च देतो,असे सांगुन तेथुन पळुन गेला त्यानंतर जखमींना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणुन उपचार करण्यात आले. लक्ष्मीबाई गवळी यांना देवरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हर्षा दशरथ गवळी (21, रा.जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.