भरधाव डंपरने दुचाकीला उडविले ; दोन जण जखमी

0

जळगाव । कानळदा रस्त्याकडून जळगाव शहरात वाळूने भरलेले डंपरचे प्रमाण अधिक वाढले. यात शनिवारी दुपारी कानळदा रस्त्यावरील के.सी. पार्क जवळ भरधाव डंपरने समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघे जखमी झाले असून दोघे जखमी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, बबन लहू सोनवणे (वय-24) रा.घरकुल सोसायटी जैनाबाद आणि अंकुश संतोष सोनवणे (वय-27) रा. हरी ओम नगर हे दोघे दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीएस 7609) ने कानळद्यात राहणार अंकुशचे नातेवाईकांकडे जात होते. के.सी.पार्क जवळ दुपारी 2 वाजेच्या सुमारास आल्यानंतर भरधाव वेगाने येणार्‍या वाळूने भरलेला डंपर क्रमांक (एमएच 19 वाय 3757) ने या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक देतात दुचाकी डंपरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले. रस्त्यावरील उभे असलेल्या तरूणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमींना खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. घटना घटल्यानंतर डंपरचालक मात्र न थांबता फरार झाला.

डंपरच्या काचा फोडल्या
आव्हानेकडून कानळदामार्गे डंपर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहते. या वर्दळीमुळे रोडवर राहणारे नागरीक त्रस्त झाले आहेत. वाळू उपसा आणि वाहतूक बंद असतानाही शहरातून सर्रासपणे वाळू वाहतूक सुरू असते. डंपरमुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून वाहने चालवावी लागतात. शनिवारी घडलेल्या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी डंपरवर दगडफेक करीत काचा फोडल्या.वारंवार तक्रारी देवूनही कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नसल्याची ओरड येथील रहिवाशीची आहे.

काही वेळ तणावाचे वातावरण
दरम्यान तरूणांकडून डंपरच्या काचा फोडल्याने परीसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलीसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सपोनि कोसे यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणली. यावेळी आरोपी फरार झाला होता. पोलीस कर्मचार्‍यांनी डंपर आणि दुचाकी दोन्ही शहर पोलीसांनी जप्त केले असून डंपर चालकाच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.