भाजपच्या भारती सोनवणे जळगावच्या 15 व्या महापौर

0

शिवसेनेसह एमआयएमचा पाठिंबा;महापौरपदी बिनविरोध निवड; निवडीनंतर जल्लोष

जळगाव– महापौर निवडीची सभा सोमवारी पार पडली. शिवसेना,एमआयएमने पाठिंबा दिल्यामुळे महापौरपदासाठी भाजपच्या भारती सोनवणे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची घोषणा पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केली. भारती सोनवणे या जळगाव मनपाच्या 15 व्या महापौर म्हणून विराजमान झाल्या आहेत. दरम्यान,निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच महानगरपालिकेच्या आवारात ढोलताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला.

महानगरपालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात महापौर निवडीची प्रक्रिया पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी व्यासपीठावर आयुक्त डॉ.उदय टेकाळे,नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. महापौर पदासाठी भाजपच्या भारती सोनवणे यांनी चार अर्ज दाखल केले होते. छाननीअंती चारही अर्ज वैध ठरले.पहिल्या अर्जावर सुचक म्हणून भगत बालाणी अनुमोदक म्हणून राजेंद्र घुगे-पाटील ,दुसर्‍या अर्जावर सुचक म्हणून अ‍ॅड.दिलीप पोकळे अनुमोदक म्हणून नवनाथ दारकुंडे,पहिल्या अर्जावर सुचक म्हणून जितेंद्र मराठे अनुमोदक म्हणून सरीता नेरकर तर चौथ्या अर्जावर सूचक म्हणून माजी महापौर सीमा भोळे तर अनुमोदक म्हणून मयूर कापसे यांची स्वाक्षरी होती. अर्जाच्या छाननीनंतर माघारीसाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली होती. भारती सोनवणे यांचे एकमेव अर्ज असल्याने पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी महापौरपदी भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर जिल्हाधिकारी व आयुक्तांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन,नितीन लढ्ढा,विष्णू भंगाळे,नितीन बरडे प्रशांत नाईक यांच्यासह आमदार राजूमामा भोळे,भाजपचे महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी,उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे,स्थायी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांसह कार्यकत्यांनी भारती सोनवणे यांचा सत्कार केला.

फटाके फोडून जल्लोष

महापौरपदासाठी भाजपच्या भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मनपाच्या आवारात ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला. सभागृहात भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पक्षाचा स्कार्फ आणि टोप्या घातल्या होत्या. भारती सोनवणे यांनी महापौरपदाचा पदभार घेतल्यानंतर त्या भाजप कार्यालयात आणि त्यानंतर श्रीराम मंदिर संस्थानात जावून दर्शन घेतले.

आतापर्यंत महापौरपदाची यांना मिळाली संधी

भाजपच्या भारती सोनवणे या जळगाव मनपाच्या 15 व्या महापौर म्हणून विराजमान झाल्या आहेत. या आधी आशाताई कोल्हे, तनुजाताई तडवी,रमेशदादा जैन,प्रदीप रायसोनी,अशोक सपकाळे,सदाशिव ढेकळे, विष्णू भंगाळे, जयश्री धांडे, किशोर पाटील,राखीताई सोनवणे,नितीन लढ्ढा,ललित कोल्हे,गणेश सोनवणे(प्रभारी),सीमाताई भोळे यांना महापौरपदाची संधी मिळाली होती.