भाजपाचे नगरसेवक राजेंद्र नाटकरांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळच्या राजकीय वर्तुळात उडाली खळबळ ; तक्रारदाराची दुचाकी अडवत मारहाण करून जीवे ठार मारण्याची दिली धमकी

भुसावळ- मागील भांडणाच्या कारणावरून एकास बेसबॉलने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक राजेंद्र नाटकरसह सहा जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नाटकर यांच्या दोघा मुलांसह तीन पुतण्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. लोकप्रतिनिधीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण
तक्रारदार नवाबलाल मोहम्मद गवळी (35, गवळीवाडा, भुसावळ) हे 3 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास टेक्नीकल हायस्कूलजवळून दुचाकीने जात असताना नगरसेवक पूत्र विशाल राजेंद्र नाटकर यांनी दुचाकी अडवत जुन्या भांडणाच्या कारणावरून बेसबॉलच्या लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण केली तसेच शुभम राजेंद्र नाटकर, किर्तीकेश संजय नाटकर, मयूर साहेबराव नाटकर, नितीन साहेबराव नाटकर, भाजपा नगरसेवक राजू त्र्यंबक नाटकर (रा.सुतार गल्ली, गवळीवाडा, भुसावळ) यांनी चापटा-बुक्क्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, डोक्यावर मारहाण झाल्याने नवाबलाल गवळी यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून शहर पोलिसांनी तेथे जावून जवाब नोंदवत गुन्हा दाखल केला. अद्याप आरोपींना अटक नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी करीत आहेत.