भाजपाने तोडपाणी करणार्‍यांना उमेदवारी दिली

0 1

ना. गिरीश महाजनांची मस्ती जिरवा : आ. डॉ. सतीश पाटील

जळगाव – भाजपाने विद्यमान खा. ए. टी. पाटील यांचे तिकीट कापून तोडपाणी करणार्‍यांना उमेदवारी दिली असल्याचा आरोप आ. डॉ. सतीश पाटील यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे नाव न घेता केला.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आ. डॉ. पाटील बोलत होते. त्यांनी भाजपासह जिल्ह्यातील मंत्र्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पालकमंत्री या जिल्ह्यात दिसतच नाही. जिल्ह्याला कुणीही वाली राहिलेला नाही. डीपीडीसीच्या बैठका वेळेवर होत नाही. त्यामुळे जिल्हा विकासाच्या दृष्टीने मागे गेला आहे. जळगाव लोकसभेचे 10 वर्ष नेतृत्व करणार्‍या खा. ए. टी. पाटील यांचे तिकीट कापले गेले. त्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी षड्यंत्र रचल्याचा आरोप खा. पाटील यांनी केला आहे. या आरोपाचा जाब विचारला गेला पाहिजे, अशी मागणी डॉ. सतीश पाटील यांनी केली.

गिरीश महाजनांचा हिशेब चुकता करा

ना. गिरीश महाजन यांना सत्तेचा माज आला आहे. त्यांची मस्ती जिरवण्याची वेळ आता आली आहे. महाजनांना धोबीपछाड देऊन हिशेब चुकता करा, असे आवाहन आ. डॉ. सतीश पाटील यांनी जाहीर सभेत केले. दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघाचे पत्ते आम्ही राखून ठेवले आहेत. ते उद्यापर्यंत जाहीर होईल, असे सांगून रावेर लोकसभेचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला.