भाजपाला कमकुवत करण्यासाठी योग्य निर्णय: अबू आझमी

0

मुबईः राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मिळून सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्या दिशेने हालचाली सुरु झाल्या आहेत. आज कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आपल्या मित्रपक्षासोबत चर्चा करणार आहे. कॉंग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी हे पहिल्यापासून हिंदुत्ववादी विचारधारेला कडाडून विरोध करत आले आहेत. त्यांनी या स्थापनेला समर्थन केले आहे. या विषयी त्यांना विचारले असता, भाजपाला कमकुवत करण्याच्या दृष्टीने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

अबू आझमी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या विषयी मत व्यक्त केलं. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून देश विनाशाकडे चालला आहे. हिंदू, मुस्लीम, मंदिर-मशीद, गाय-बैल यातच अडकला आहे. संधी मिळाली तर ते पुन्हा शिवसेनेला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतात. त्यापेक्षा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं कधीही चांगलं. मोठ्या शत्रूला कमकुवत करण्यासाठी छोट्या शत्रूला जवळ केल्याचं त्यांनी सांगितलं. भिवंडी महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असल्याचं त्यांनी नमूद केलं.

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्णयाचं स्वागत करतानाच, शिवसेनेला समरस व्हावं लागेल, असंही त्यांनी सूचित केलं. त्यात त्यांचा रोख हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे आहे. मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्डाशी संबंधित काही विषय भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये मार्गी लागले नव्हते; त्यावर यावेळी निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णयही दोन्ही काँग्रेसनी घेतला आहे. या पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला अबू आझमी यांनी पसंती दर्शवली आहे. उद्धव ठाकरे हे कमी आक्रमक आहेत. मुस्लिम आरक्षणाला त्यांचा प्रखर विरोध नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार व्हावं, अशी इच्छा आझमींनी व्यक्त केली.