भादलीजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड ; वाहतूक ठप्प

0

भुसावळ- भादली दरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने अप मार्गावर तब्बल सव्वा तास वाहतूक ठप्प झाली. तीन एक्सप्रेस भुसावळ स्थानक तर तीन एक्सप्रेस गाड्या यार्डात थांबविण्यात आल्या. पश्चिम रेल्वेच्या सुरतकडे कोळसा घेवून जाणार्‍या मालगाडीच्या इंजिनात भादली स्थानकाजवळ 12.40 वाजता बिघाड झाला. या मालगाडीला दोन इंजिन होते, सेकंड इंजिनात बिघाडामुळे वाहतूक थांबली. या गाडीच्या मागे एक मालगाडी व अप मार्गावरील काशी एक्सप्रेस भुसावळ ते भादली दरम्यान अडकली तर अप मार्गावरील पुष्पक, गुवाहाटी व ताप्तीगंगा एक्सप्रेस या तिन्ही गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या. या तिन्ही गाड्यांना तब्बल 55 ते 60 मिनिट स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले होते तर दिल्ली मार्गावरुन येणार्‍या साकेत व कर्नाटक तर नागपूर मार्गावरुन येणारी अमरावती सुरत या गाड्या यार्डात थांबविण्यात आल्या. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान मालगाडीतील सेकंड इंजिनची दुरुस्ती केल्यानंतर वाहतूक वाहतूक सुरळीत झाली. बिघाड झालेल्या मालगाडीच्या मागे पून्हा दुसरी मालगाडी व काशी एक्सप्रेस असल्याने प्रथम या गाड्या काढून नंतर भुसावळ स्थानक व यार्डातील गाड्या काढण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत सव्वा ते दीड तास वाहतूक ठप्प होती. यामुळे जळगाव, नाशिक, मुंबई व सुरतकडे जाणार्‍या प्रवाशांनी संताप व्यक्त केला.