भामट्याने चक्क घरात घुसून 5 हजार रुपये असलेली पॅन्ट लांबविली

0 1

प्रभात कॉलनीतील प्रकार ; विद्यार्थ्यांनी भामट्याला चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन; पॅन्ट दिलेला साथीदार पसार ; भामट्याकडे दुसर्‍याचा महागडा मोबाईल सापडला

जळगाव- शहरातील प्रभात कॉलनी परिसरात भामट्याने घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चक्क घरात घुसून पॅन्ट घेवून पोबारा केल्याची घटना शनिवारी सायंकाळी समोर आली आहे. दरम्यान या भामट्याला परिसरातील विद्यार्थ्यांनी पकडून बेदम चोप दिला. चौकशीत त्याच्याकडून याच कॉलनीतून विद्यार्थ्यांचा चोरलेला महागडा मोबाईल सापडला आहे. मात्र भामट्याने ज्याच्याकडे पॅन्ट दिली तो साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी दारुच्या नशेत असलेल्या भामट्याला ताब्यात घेतले आहे.

शहरातील प्रभात कॉलनीत प्लॉट नं 5 मातृस्मृती भवन येथे बालाजी रघुनाथ विश्‍वास राहतात. ते दुपारी 4.30 वाजता घरी आले. यानंतर जेवण केल्यावर झोपले. यादरम्यान घराचा दरवाजा उघडा होता. यादरम्यान दारुच्या नशेत असलेला एक भामटा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत विश्‍वास यांच्या घरात घुसला. काही एक आवाज न होवू देता त्याने हळूच उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. यानंतर घरात लटकवलेली पॅन्ट काढली. व पॅन्ट घेवूनच तो घराबाहेर पडला.

विश्‍वास उठल्यावर प्रकार उघड
विश्‍वास यांच्या घरातून लांबविलेली पॅन्टमध्ये त्यांचे 5 हजार रुपये तसेच गाडीची चाबी व पाकीटात काही कागदपत्रे होती. तासाभराने विश्‍वास उठले. बाहेर जाण्यासाठी त्यांनी पॅन्ट बघितली असता त्यांना पॅन्ट गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत आजूबाजूला विचारणा केली. परिसरात काही विद्यार्थ्यांनी खोली करुन राहतात. विद्यार्थ्यांना प्रकार कळताच त्यांनी परिसरात शोध घेतला.

विद्यार्थ्यांना पैसे वाटून घेण्याची ऑफर
विद्यार्थ्यांना विश्‍वास यांच्या घराजवळ काही वेळापूर्वी फिरणारा एक इसम दिसला. खात्री केल्यावर तो भामटाच निघाला. मद्याच्या अवस्थेत असलेल्या या भामट्याने विद्यार्थ्यांना अर्धे अर्धे पैसे वाटून घेण्याची ऑफर दिली. पॅन्ट मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी होकार दिला. मात्र पॅन्ट मिळवून देण्याच्या बहाण्याने भामटा विद्यार्थ्यांना प्रभात चौकात घेवून गेला व याठिकाणी उभ्या वाहतूक पेालिसांना विद्यार्थी मारत असल्याचा बनाव केला.

दुसर्‍याचा चोरलेला मोबाईल सापडला
पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून प्रकार जाणून घेत. भामट्याला लांबविलेल्या पॅन्टबाबत विचारपूस केली असता साथीदाराला पॅन्ट दिल्याचे सांगितले. झडती घेतली असता त्याच्याकडे याच परिसरातील एका घरातून विद्यार्थ्यांचा 14 हजार रुपयांचा लांबविलेला मोबाईल सापडला. यानंतर वाहतूक पोलिसांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फोन करुन प्रकार कळविला. पोलिसांनी भामट्याला ताब्यात घेतले असून तो त्याचे नाव सांगण्यास टाळाटाळ करीत आहे. तक्रारीसाठी विश्‍वास यांनीही रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.