भारताचे न्युझीलंड समोर ३४८ धावांचे लक्ष

0

हॅमिल्टन: भारत, न्युझीलंड यांच्यात आज होत असलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्युझीलंड समोर ३४८ धावांचे लक्ष दिले आहे. श्रेयस अय्यरच्या धडाकेबाज शतकाने भारताने हा पल्ला गाठला. त्याला कर्णधार विराट कोहली-लोकेश राहुलने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात ३४७ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत हॅमिल्टनच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. एका क्षणाला संकटात सापडलेल्या भारतीय संघाने मोक्याच्या क्षणी भागीदारी रचण्यावर भर देत, मोठं आव्हान उभं केलं.

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारताकडून मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी सलामीला मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र भारतीय सलामीवीरांना झटपट माघारी धाडण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. विराट कोहली इश सोधीच्या गोलंदाजीवर ५१ धावा काढून माघारी परतला.

यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल जोडीने पुन्हा एकदा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी १३६ धावांची भागीदारी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. श्रेयस अय्यरने यादरम्यान आपलं शतकही पूर्ण केलं. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर अय्यर १०३ धावा काढून माघारी परतला. दरम्यान लोकेश राहुलनेही यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताला त्रिशतकी धावसंख्या ओलांडून देण्यासाठी मदत केली. लोकेश राहुलने नाबाद ८८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने २, कॉलिन डी-ग्रँडहोम आणि इश सोधीने १-१ बळी घेतला.