भीमसृष्टीत माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणार !

0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात साकारल्या जाणा-या भीमसृष्टीत माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मान्यता देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली.

महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात भीमसृष्टी साकारली जात आहे. भीमसृष्टीत म्युरल्स बसविण्याचे काम सुरु आहे. भीमसृष्टीत माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी स्थानिक नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, नगरसेविका वैशाली घोडेकर, गीता मंचरकर यांनी केली होती. त्यासोबतच धम्मदीप प्रतिष्ठान, डॉ. बी.आर. आंबेडकर ग्रुप यांनी देखील मागणी केली होती.

या मागणीचा विचार करत महापौर राहुल जाधव यांनी भीमसृष्टीत माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माता रमाई आंबेडकर यांचा भीमसृष्टीत पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मान्यता देत अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली.

भीमसृष्टीमध्ये 19 म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. यामध्ये माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1946 रोजी राज्यघटना सुपूर्द करताना, नागपूर येथील दीक्षाभूमी येथे केलेले भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुटुंबियांसमवेत असलेला फोटो, प्रबुद्ध भारत मुकनायकाचे लायब्ररीत टेबलावर लिखाण करताना, माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचा नेता घोषित करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळ्या घटनांचे म्युरल्स येथे असणार आहेत.