भुसावळकरांना दिलासा ; 15 रोजी आवर्तन सुटणार

0 2

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश ; 20 पासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार

भुसावळ- रेल्वेच्या अप्पर बंधार्‍यातून पाणी सोडल्याने शहरावर टंचाईचे संकट नसलेतरी आगामी उन्हाळ्याची स्थिती पाहता हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालिका व रेल्वेने जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केल्यांतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी हतनूर धरणातून 15 रोजी 8.80 दलघमी आवर्तन सोडण्याचे आदेश दिल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीपनगर प्रकल्पाने तूर्त पाण्यासंदर्भात मागणी केली नसली तरीदेखील धरणाच्या खालील बाजूस सर्वांत आधी प्रकल्पाचा बंधरा असल्याने तो भरल्यानंतरच रेल्वेसह पालिकेच्या बंधार्‍यात पोहोचते. आता दीपनगर बंधार्‍याची जलपातळी 2.09 मीटरने कमी असून 5.23 दलघमी इतकाच जलसाठा शिल्लक आहे. आवर्तनामुळे बंधार्‍याच्या साठ्यातही वाढ होणार आहे तर भुसावळकरांना टंचाईचे चटके सोसावे लागण्यापूर्वीच मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, भुसावळ शहरवासीयांना पाण्यासाठी कुठलेही हाल सोसावे लागणार नाहीत त्यासाठी सत्ताधारी व पालिका प्रशासनाचे नियोजन झाले असल्याचे पाणीपुरवठा सभापती महेंद्रसिंग ठाकूर म्हणाले.