भुसावळच्या टाडा खटल्यातील 11 संशयीतांची निर्दोष मुक्तता

0

25 वर्षानंतर मिळाला न्याय ; देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्‍वास -शफी पहेलवान

भुसावळ- शहरातील गाजलेल्या टाडा खटल्यातील 11 संशयीत आरोपींची सबळ पुराव्याअभावी नाशिक विशेष मोक्का व टाडाचे न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. शहरातील मुस्लीम बांधवांना भडकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भुसावळातील सात तर मुंबईच्या चार मिळून 11 आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात 1994 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 25 वर्ष हा खटला चालला. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आपला विश्‍वास असून राजकीय दबावाने आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता मात्र न्याय मिळाला, अशी भावना माजी उपनगराध्यक्ष शफी पहेलवान यांनी खटल्याच्या निकालानंतर व्यक्त केली.

टाडा कलमान्वये 11 संशयीतांविरुद्ध दाखल होता गुन्हा
देशविघातक कृत्य करणे, धार्मिक भावना भडकावून दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कट कारस्थान करणे आदी कारणावरून भुसावळच्या सात तर मुंबईच्या चौघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात 1994 मध्ये टाडा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ‘टाडा’ अन्वये दोषारोपपत्र दाखल होऊन संशयितांना अटक करण्यात येवून नंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली होती. केंद्र सरकारने टाडा कायदाच रद्द केल्याने त्याचा फायदा संशयीतांना मिळविण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयात हा खटला दाखल होऊन त्यावर 2017 मध्ये हे प्रकरण नाशिक न्यायालयाने नियमित कामकाज चालवून खटला निकाली काढण्याचे आदेश दिले होते. या गुन्ह्यात साक्षीदार अथवा सबळ पुरावाच उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने 11 संशयितांची निर्दोष मुक्तता केली.

माजी उपनगराध्यक्षांसह 11 संशयीत निर्दोष
टाडा खटल्यातून भुसावळचे जमील खान अमजद खान, डॉ.युनूस फलाई, फारूक खान नजीर खान, अय्युब खान गुलाब खान, युसूफ खान, वसीम आसीफ, माजी उपनगराध्यक्ष शेख शफी शेख अजीज (शफी पहेलवान) तर मुंबईच्या मुमताज मीर, डॉ.अशपाक मिर, डॉ.हारुण वफाती, मौलाना कादीर यांची सबळ पुराव्याअभावी नाशिक न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयीत आरोपींच्या वतीने अ‍ॅड.शेख शरीफ व अ‍ॅड.अन्सार अहमद यांनी युक्तीवाद केला.

देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्‍वास -शफी पहेलवान
माझ्यासह 11 जणांविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हा राजकीय दबावतंत्रातून दाखल झालेला होता मात्र देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्‍वास असल्याने 25 वर्षानंतर का असेना आम्हाला न्याय मिळाला, अशी भावना भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष शफी पहेलवान यांनी व्यक्त केली.