भुसावळच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करावा -संजय सावकारे

0

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदारांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भुसावळ- विविध कारणांनी मुख्यमंत्र्यांचा तीन वेळा दौरा रद्द झाला मात्र आज भुसावळात आलेल्या मुख्यमंत्र्यांकडून फायदा करून घेतला जाणार असून अमृत योजनेसह रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असून बंदिस्त वरणगाव-तळवेल योजना मार्गी लागण्यासाठी 916 कोटींची मागणी करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केली. खासदार रक्षा खडसे यांच्या ‘समर्पण’ या कार्यवृत्तांताच्या प्रकाशन सोहळा गुरुवारी आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) वर झाला. प्रसंगी आयुष्यमान भारत योजनेच्या पाच लाभार्थींना गोल्ड कार्डच्या वाटपासह सावद्यासह निंभोरा व बोदवड येथील रेल्वे ब्रीजचे ऑनलाईन उद्घाटन तसेच नगरपालिका उद्यानासह प्रशासकीय ईमारतीचे व आमदार निधीतील उद्यानाचे रीमोटद्वारे मुख्यमंत्र्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

भुसावळात मोठे उद्योग आल्यास बेरोजगारी होणार दूर
आमदार सावकारे म्हणाले की, भुसावळात अ‍ॅक्सीडेंटल केसेस चालण्याबाबत दखल घ्यावी तसेच अमृत योजनेचा सर्व नागरीकांना लाभ मिळण्यासाठी शहर हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अमृत योजनेसाठी रीव्हाईज डीपी तयार करण्यात येत असून प्लॅननंतर निधी द्यावा तसेच भुसावळ ग्रामीण रुग्णालयासह ट्रामा सेंटर मंजूर असलेतरी स्टाफ मंजूर नसल्याने तातडीने त्याबाबत फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, क्रीडा संकुलाला तालुका क्रीडा अधिकारी देण्यासह अतिरीक्त क्रीडा शिक्षकांचे समायोजन करून, भुसावळात मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आणल्यास बेरोजगारांच्या हातांना काम मिळवून ते वामवार्गाला लागणार नाहीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. भुसावळ शहरात असलेल्या बसस्थानकामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने लांब पल्ल्याच्या बसेस शहराबाहेर सुटण्याबाबतही दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदारांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरभीनगरातील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, आमदार राजू मामा भोळे, प्रमोद सावकारे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी आमदारांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच सभास्थळाबाहेर उभारण्यात आलेल्या शहिद स्तभांवरही मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा हार, बुके न देता कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुस्तक देवून सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले.