संचारबंदीत भुसावळकर द्विधा मनस्थितीत

0

औषध दुकानदारांनी निर्णय घेतला मागे : ग्राहकांअभावी व्यापार्‍यांना फटका

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदी सुरू आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असलेतरी भुसावळकर मात्र द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांकडून फटके बसण्यासह गुन्हे दाखल होण्याची भीती असल्याने घराबाहेर पडावे अथवा पडू नये? असा प्रश्‍न भुसावळकरांना पडला आहे तर दुसरीकडे किराणा दुकानदारांसह औषध दुकानदारांचाही मनस्ताप वाढला आहे. सकाळच्या वेळेनंतर दिवसभर दुकानांवर ग्राहक येत नसल्याने आता करावे काय? हादेखील प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला आहे. गिर्‍हाईकच येत नसल्याने सकाळनंतर या व्यावसायीकांना हातावर हात ठेवून बसावे लागत आहे त्यामुळे पोलिस प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसभरात नागरीक बाहेर पडत असल्यास आधी विचारपूस करावी व नंतर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

औषध दुकानदारांनी निर्णय घेतला मागे
पोलिसांच्या कारवाईनंतरही अनेक नागरीक औषध दुकानावर जाण्याचे निमित्त सांगून विनाकारण बाहेर पडत असल्याने रविवार, 5 एप्रिलपासून शहरातील सर्व औषध विक्रीची दुकाने सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक प्रशासनानेही औषध विक्रेत्यांना दुकाने उघडी ठेवण्याच्या सूचना केल्यानंतर भुसावळ मेडिसिन्स डिलर असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ काबरा यांनी हा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले.

पोलिसांकडून विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई -पोलिस उपअधीक्षक
शहरात विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवरच पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे शिवाय जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरीक बाहेर आल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी सांगितले. नागरीकांनीही क्षुल्लक-क्षुल्लक गोष्टींसाठी बाहेर पडणे टाळावे शिवाय बाहेर पडताना तोंडाला मास्क वा रूमाल बांधवा, असेही ते म्हणाले.