भुसावळातील गुन्हेगारी ठेचण्यासह जनतेत समन्वय राखणार

0

नूतन पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांची ग्वाही : पदभार स्वीकारला

भुसावळ- शहरातील वाढती गुन्हेगारी ठेचण्यासह चोर्‍या-घरफोड्यांना पायबंद घालण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येतील तसेच पोलीस व जनतेत नेहमीच समन्वयासह सलोखा राखण्यावर भर देणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दिली. मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘दैनिक जनशक्ती’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची अपर पोलीस अधीक्षक म्हणून बढतीवर मालेगाव येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी गडचिरोलीतील सिंरोचा येथील उपअधीक्षक राठोड यांची भुसावळ येथे बदली करण्यात आली होती. सुमारे दोन महिन्यांपासून त्यांची बदली झाली असलीतरी त्यांचा तेथील कार्यकाळ पूर्ण न झाल्याने त्यांनी भुसावळातील पदभार स्वीकारला नव्हता.

कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देणार -राठोड
भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यावर आपला निश्‍चितच भर राहिल शिवाय वाढत्या चोर्‍या-घरफोड्या उघडकीस आणण्यासही आपले प्राधान्य राहणार आहे. शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या डीबी शाखेचे नव्याने गठण करून कार्यक्षम कर्मचार्‍यांना त्यात स्थान देण्यात येईल, असेही राठोड म्हणाले.

अपर पोलीस अधीक्षकांनी सोपवला पदभार
अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी राठोड यांना मंगळवारी पदभार सोपवत शुभेच्छा दिल्या. प्रसंगी, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, उपनिरीक्षक विशाल पाटील, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक यतीन ढाके, माजी नगरसेवक अजय भोळे, वरुण इंगळे, शुभम महाजन आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नीलोत्पल यांचे कार्य शहरवासीयांसाठी प्रेरणादायी
दिड वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झालेल्या नीलोत्पल यांनी भुसावळवासीयांच्या मनात घर केले होते. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासह छेडखानीच्या प्रकारांना त्यांना आळा बसवला शिवाय शहरच नव्हे संबंध जिल्हाभरातील भाऊ-दादांच्या कार्यकर्त्यांवरील अवैध धंद्यांवर धाडी टाकत कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, हा संदेशही दिला होता. नागरीकांशी सलोखा राखत गुन्हेगारांनाही त्यांनी त्यांच्याच भागात नेत तेथे ‘खाकी’चे दर्शन घडवले होते शिवाय कुठल्याही राजकीय दबावाला थारा न देता पोलीस दलाविषयी जनतेत आदराचे स्थान निर्माण केल्याने भुसावळकरांना त्यांचे कार्य निश्‍चितच स्मरणात राहील, यात शंका नाही.