भुसावळातील ‘त्या’ तरुणाचा अखेर मृतदेहच लागला हाती

0

20 तासांच्या परीश्रमानंतर सापडला मृतदेह : श्री क्षेत्र मनुदेवी तलावातील दुर्घटना

यावल- मैत्री दिनाचे औचित्य साधून यावल तालुक्यातील श्री क्षेत्र मनुदेवीला भुसावळातील 12 मित्रांचा ग्रुप आला असताना पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेवूनही तरुण सापडत नसल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते तर सोमवारी सकाळपासून शोध कार्याला वेग दिल्यानंतर साडेदहा वाजेच्या सुमारास या तरुणाचा मृतदेहच हाती लागल्याने नातेवाईकांनी हंबरडाच फोडला. वैभव संजय गाजले (17) असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे भुसावळातील गुंजाळ कॉलनी भागात शोककळा पसरली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. सोमवारी तब्बल अडीच तास तलावात पोहून श्रावण कौतीक भोई व प्रकाश पुरण परदेशी यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला.

मैत्र दिनाला घडली दुर्घटना
रविवारी मैत्र दिवस असल्याने भुसावळच्या गुंजाळ कॉलनीमधील 12 तरुण यावल तालुक्याच्या पश्चिम भागात सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी येथे दर्शनासाठी आले होते. सर्व मित्रांनी वनविभागाच्या उद्यानात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर वैभव संजय गाजले (17) हा तरुण पोहोण्यासाठी पाझर तलावात उतरला व क्षणार्धातच तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून नागरीकांना माहिती दिली व पोलिसांना कळवले मात्र घटनास्थळी पोहणारे कुणीही नसल्याने वैभवचा पाण्यात बुडाला होता तर जिवंत असण्याची आशादेखील धुसर झाली होती मात्र रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध न लागल्याने शोध कार्य थांबवून ते सोमवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेहच हाती लागल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला. दरम्यान, वैभव या वर्षीच दहावी उत्तीर्ण झाला होता तर त्याने आयटीआयसाठी अर्जदेखील केला होता. त्याचे वडील हे व्यवसायाने धोबी असून कपड्यांना इस्त्री करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.