भुसावळातील दरोड्याप्रकरणी संशयीत गुन्हे शाखेच्या रडारवर

0 1

जखमी मोलकरणीने सांगितले चोरट्यांचे वर्णन : जखमी सिंग यांना मुंबईत हलवणार

भुसावळ- शहरातील नामांकित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.आर.पी.सिंग यांच्या झेडटीसी भागातील शांतीधाम परीसरातील निवासस्थानी शनिवारी भरदिवसा सकाळी चोरट्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता तर त्यास विरोध केल्याने चोरट्याने प्राचार्यांच्या पत्नी शकुंतला राजेंद्र सिंग व घर कामाला असलेली मोलकरीण रत्ना संतोष तायडे यांच्यावर हातोडी हल्ला चढवत गंभीर जखमी केले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर पोलीस प्रशासन हादरले असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारपासून भुसावळात तळ ठोकून आहे. रत्ना तायडे यांना गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील काही आरोपींचे छायाचित्र दाखवल्यानंतर त्यातील तीन संशयीतांचे वर्णन काहीसे मिळते-जुळते असल्याने त्याबाबत गुन्हे शाखेकडून कसून तपास केला जात आहे. दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शकुंतला सिंग या शुद्धीवर आल्या असून त्यांना सोमवारी मुंबई येथे अधिक उपचारार्थ हलवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घटनास्थळी आढळला चोरट्यांचा रूमाल
शनिवारी सकाळी घटना घडल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, निरीक्षक अरुण हजारे, जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागुल, एएसआय मुरलीधर आमोदकर, रवींद्र पाटील, शरीफ काझी, दीपक पाटील, महेंद्र पाटील, नरेंद्र वारूळे, विनयकुमार देसले, इद्रीस पठाण आदींनी धाव घेतली होती. घटनास्थळी चोरट्यांचा लाल रंगाचा रूमाल आढळल्यानंतर श्‍वानास त्याचा वास दिल्यानंतर श्‍वानाने बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या विहिरीपर्यंत माग दाखवला मात्र त्यानंतर श्‍वान तेथेच घुटमळले. त्यामुळे चोरटा भिंतीवरून उडी मारून पसार झाला, असावा असा संशय आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केली असल्याचा कयास आहे. चोरट्यास प्राचार्य सिंग यांची दिनचर्या माहित असल्याची सूत्रांची माहिती असल्याने ते घराबाहेर पडल्यानंतर चोरट्याने डाव साधला मात्र सौ.सिंग यांनी त्यास प्रतिकार केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला तर त्या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध झाल्यानंतर चोरटा चोरी करीत असतानाच मोलकरीण रत्ना तायडे धडकल्याने त्यांनीही आरडा-ओरड केल्याने चोरटा बिथरला व त्यानेही तिच्यावर लोखंडी हातोडीने हल्ला चढवला. तायडे यांनी वेळीच धाव घेतली नसती तर आणखी काही अप्रिय घटना घडली असती, अशीदेखील चर्चा आहे.

गुन्हे शाखेकडून कसून तपास
मोलकरीण तायडे यांनी गुन्हे शाखेला चोरट्याचे वर्णन सांगितले असून त्या दृष्टीने पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो त्यांना दाखवण्यात आले. त्यातील तीन संशयीतांचे चेहरे तायडे यांनी सांगितलेल्या वर्णनाशी मिळते-जुळते असल्याने त्या दृष्टीने गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.