भुसावळातील प्रथितयश डॉक्टरांकडे आयकराच्या धाडी

0

वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ ; उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी

भुसावळ- शहरातील दोन प्रथितयश एम.डी.मेडिसीन असलेल्या डॉक्टरांकडे आयकर विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी एकाचवेळी धाडी टाकल्याने शहरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाच्या अधिकार्‍यांकडून कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू होती मात्र कुठलीही माहिती देण्यास अधिकार्‍यांनी नकार दिला.

आयकराच्या धाडीमुळे शहरात खळबळ
शहरातील पांडुरंग टॉकीजमागे डॉ.जयंत धांडे यांच्या जयंत हॉस्पीटलसह जामनेर रोडवरील डॉ.स्वप्नील कोळंबे यांच्या कोळंबे हॉस्पीटलवर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी अचानक धाड टाकली. दोघाही व्यावसायीकांनी सुमारे वर्षभरापूर्वीच प्रशस्त हॉस्पीटल सुरू केल्याचे सांगण्यात आले. पाच ते सहा अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या अधिकार्‍यांच्या पथकाने अचानक हॉस्पीटलमध्ये शिरत कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू केल्याची माहिती शहरात कानोकानी कळताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. संबंधित अधिकारी जळगावसह नाशिक येथून आल्याचे सांगण्यात आले मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी धुळ्यासह जळगावातील डॉक्टरांकडे आयकर विभागाने धाडी टाकल्याने खळबळ उडाली होती. आयकर अधिकार्‍यांना या धाडीत नेमके काय आढळले? याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती कळू शकली नाही.