भुसावळातील भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घराबाहेर गोळीबार

0

दगडफेकीत एक जण जखमी ; नगरसेवकासह चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

भुसावळ- शहरातील भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या समता नगर भागातील एका गटातील जमावाने प्रचंड दगडफेक केल्याने एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री दिड वाजेनंतर घडली. याप्रसंगी गावठी कट्ट्यातून तीन हवेत फैरी झाडल्याचीदेखील माहिती असून पोलिसांनी गोळीबार झाला वा नाही? याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणी नगरसेवक खरात यांच्यासह चौघांनी शहर पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

मध्यरात्री भिडले दोन गट
अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र खरात यांच्या समता नगर भागातील घराजवळ मध्यरात्री रवींद्र खरात, नरेंद्र उर्फ बाळा मोरे तसेच दुसर्‍या गटातील राहुल उर्फ बाळा सोनवणे, गिरीश तायडे यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. जमावाने खरात यांच्या चारचाकी वाहनासह दुचाकीची मोडतोड केली तर समोरा-समोर झालेल्या दगडफेकीत योगेश हिरालाल मोघे हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी झाडलेल्या गोळीची रीकामी पुंगळी मिळाली आहे तर मतानी यांनी मात्र गोळीबार झाला वा नाही याचा तपास सुरू असून 24 तासात नेमक्या वादाचे कारणही स्पष्ट होईल, असे सांगत रवींद्र खरात, नरेंद्र मोरे, राहुल सोनवणे, गिरीश तायडे यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. प्रसंगी मतानी यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांच्यासह शहरचे प्रभारी निरीक्षक देविदास पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.