भुसावळातील रस्त्यांच्या कामांसह मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याबाबत प्रांतांकडे याचिका

0

मुख्याधिकार्‍यांसह नगराध्यक्षांविरुद्ध नोटीस :19 रोजी याचिकेवर सुनावणी

भुसावळ :भुसावळ शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था तातडीने थांबवून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, डेंग्यू आजाराने थैमान घातल्याने तातडीने त्यावर नियंत्रण मिळवून उपाययोजना कराव्यात, फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे, शहरातील नाल्यांसह गटारींची स्वच्छता करावी, उद्यानांची योग्य देखभाल करून दुररुस्ती करावी यासह मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्याबाबत भुसावळ प्रांताधिकार्‍यांकडे रवींद्र नारायण भोळे यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे तसेच नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 133 प्रमाणे समस्या हटवण्यासाठी याचिका दाखल केली आहे. प्रांताधिकार्‍यांनी याचिकेची दखल घेत उभय पदाधिकार्‍यांना नोटीसा बजावत 19 रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असताना नागरीकांना थेट आता याचिकेचा पवित्रा घ्यावा लागत असल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी जनतेच्या संयमांचा अंत पाहू नये अन्यथा काही दिवसात त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही नागरीक आता बोलत आहे.

समस्या सोडवण्यासाठी याचिका
शहरातील रवींद्र भोळे यांनी शहातील समस्या सुटण्यासाठी अ‍ॅड.राजेंद्र टी.राय यांच्या मार्फत प्रांताधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली आहे. शहरात वाढत असलेला डेंग्यूचा फैलाव तत्काळ रोखावा, नगरपालिका दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करून आरोग्य सेवा पुरवावी, शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरावेत, फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे, पथदिवे सुरू करावेत, गटारीसह नाल्यांची स्वच्छता करावी, स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करावा, उद्यानांची देखभाल करून दुरुस्ती करावी, अशी मागणी फौजदार प्रक्रिया संहिता कलम 133 अन्वये याचिका प्रांतांकडे दाखल करण्यात आली. या याचिकेप्रकरणी नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांविरुद्ध नोटीस काढण्यात आली असून 19 रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

अधिकार घटवल्याने तत्काळ उपाययोजनांना अडचण -नगराध्यक्ष
लोकनियुक्त नगराध्यक्षांचे अधिकार घटवल्याने तत्काळ उपाययोजना करण्यास अडचण निर्माण होते, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. संबंधितानी नेमकी काय याचिका दाखल केली ? याबाबत आपणास कल्पना नाही मात्र डेंग्यूबाबत प्रभावी उपाययोजना सुरू असून सहा कामगारांकडून शहरात फवारणी सुरू आहे तसेच पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांची दुरुस्ती केली मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसाने ‘जैसे थे’ स्थिती झाल्याचे ते म्हणाले.