भुसावळातील लष्करी डेपोत जवानाची गोळी झाडून आत्महत्या

0

भुसावळ : भुसावळातील लष्करी डेपोतील 32 वर्षीय जवानाने स्वतःच्या इन्सास रायफलमधून गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजून पाच मिनिटांनी घडली. मंगेश जीनवर भगत (वय 32 रा. चिखली ता. बुलढाणा) असे या मृत जवानाचे नाव आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
टरीटोरीयल आर्मीच्या 118 नंबरच्या बटालियनमधील जवान मंगेश जीनवर भगत हे वॉटर पॉईंट ड्युटीवर असतानाच बुधवारी सकाळी 11.05 वाजता हानोटीला इन्सास रायफल लावून स्वत:च गोळी चालवित आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल चौधरी, विनोद तडवी, नागेंद्र तायडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. बटालियन 188 ही नागपूर येथून नोव्हेंबरमध्ये येथे आल्याचे सांगण्यात आले तर टेरीटोरियल आर्मीचे भुसावळ हे मुख्यालय असून नोव्हेंबरपासून या बटालियनमधील जवान येथे कार्यरत आहे. दरम्यान, मयत जवानाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यातील मजकूर सांगण्यास पोलिस सूत्रांनी नकार दिला. याबाबत नाईक कुंदनसिंग राठोड यांनी शहर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.