भुसावळातील 17 हजार 856 ईव्हीएमला पोलिसांचा खडा पहारा

0 1

जळगावसह रावेर लोकसभेच्या ईव्हीएमवर राहणार जीपीएस यंत्रणेचे लक्ष

भुसावळ- देशभरात सात तर राज्यात चार टप्प्यात लोकसभा निवडणुका होत असून त्यासाठी आदर्श आचारसंहितादेखील जाहीर झाली आहे. जळगावसह रावेर लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत असून जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघासाठी आवश्यक असलेले 17 हजार 856 ईव्हीएम तहसील आवारातील शासकीय गोदामात मागील सहा महिन्यांपासून पोलिसांच्या खड्या पहार्‍यात सुरक्षित आहेत. 24 तास पोलिसांचा वॉच या मशीनवर आहे. दोन्ही मतदार संघासाठी सात हजार 488 बॅलेट युनिट, चार हजार 354 कंट्रोल व तेवढेच व्हीव्हीपॅट मागील सहा महिन्यांपासून तहसीलच्या शासकीय गोदामात ठेवण्यात आले आहेत तर काही दिवसांपूर्वी पुन्हा एक हजार 760 यंत्र आल्याने एकूण 17 हजार 856 यंत्रे बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. निवडणूक विभागाच्या आदेशानंतर जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आवश्यक असलेले मतदान यंत्रे तालुकास्तरावर पाठविण्यात येणार आहेत.

पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर
यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्या अनुषंघाने केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर अनिवार्य केला आहे. ईव्हीएम मशिमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये यासाठी प्रत्येक ईव्हीएमवर जीपीएस यंत्रणेचे लक्ष राहणार आहे.

काय आहे व्हीव्हीपॅट
एखाद्या मतदार उमेदवाराला ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान करतो. यावेळी ईव्हीएमच्या शेजारी असलेल्या व्हीव्हीपॅट मशीनमधून उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि पक्षाचे चिन्ह यांचा उल्लेख असलेली चिठ्ठी सात सेकंद मतदाराला दिसणार आहे. ती चिठ्ठी त्यानंतर एका सीलबंद पेटीत आपोआप जमा होईल. एका काचेच्या पेटीत व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्यामुळे ती चिठ्ठी मतदार फक्त बघू शकतो. व्हीव्हीपॅटला किंवा त्या चिठ्ठीला मतदाराला हात लावता येणार नाही. फक्त निवडणूक अधिकार्‍यांना ती काचेची पेटी उघडण्याचा अधिकार राहणार आहे.