भुसावळात अमृताच्या गोडव्याऐवजी रोषाची विषबाधा

0

खराब रस्त्यांमुळे सत्ताधारी भाजपा नगराध्यक्षांसह आमदारांवर नागरीकांकडून टिकेची तोफ ; शहरातील 12 जलकुंभाचे केवळ 35 टक्के काम पूर्ण ; एमजीपी सचिवांना लक्ष घालण्याचे नगर सचिवांचे आदेश

भुसावळ : भाजपाला एकहाती सत्ता द्या, तीन महिन्यात शहराचा कायापालट करू, अशी साद मतदारांना घालत माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ पालिकेत सत्तापरीवर्तन घडवत भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली होती मात्र सत्ता स्थापनेच्या अडीच वर्षानंतरही शहराचा विकास झाला कुठे? असा प्रश्‍न विचारण्याची वेळ मतदारांना आली आहे. गल्ली ते दिल्ली सरकार असतानाही भाजपाचे नेते व स्थानिक पदाधिकारी शहरातील नागरीकांना धड मूलभूत सोयी-सुविधाही पुरवू शकत नसल्याने मतदारांनामध्ये तीव्र रोष वाढला आहे. खराब रस्त्यांमुळे नागरीकांची हाडे खिळखिळी झाली असून रस्त्यांची कामे होणार कधी? असा प्रश्‍न मतदार उपस्थित करीत असून आमदारांनी देखील नागरीकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. 24 तास शुद्ध पाणी मिळेल, असे सांगून शहरात अमृत योजनेच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली. या कामासाठी पक्क्या डांबरी रस्त्यांना खोदून पाईप लाईन अंथरण्यात आली मात्र दोन वर्षानंतर ना पाईप लाईनचे काम पूर्ण झाले ना रस्त्यांची अवस्था सुधारली यामुळे भाजपा पदाधिकारी मात्र चांगलेच ट्रोल होत असून आगामी निवडणुकीत भाजपाला त्याचा फटका बसेल, असे आता मतदार बोलू लागले आहेत.

सत्ताधारी आमदारांवर जनतेचा वाढला रोष
भुसावळ पालिकेत भाजपाची सत्ता असून विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्षदेखील भाजपाचे आहेत शिवाय स्थानिक आमदारही भाजपाचे असतानाही शहरात साधी रस्त्यांची डागडूजी होवू शकत नसल्याची खंत नागरीक व्यक्त करीत आहेत. नागरीकांनी थेट आमदारांनाच या प्रश्‍नाबाबत टार्गेट केले आहे. अमृत योजनेमुळे रस्त्यांची कामे होत नसल्याचे सत्ताधारी सांगत असलेतरी रस्त्यांची डागडूजी करण्यासाठी सत्ताधार्‍यांना कुणाची प्रतीक्षा? असा प्रश्‍न नागरीक उपस्थित करीत आहेत. पावसाळ्याचे निमित्त करून खड्डे पडल्याचे सत्ताधारी सांगत असलेतरी अमृतच्या पाईप लाईनमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्याचे काय? पाईप लाईन अंथरल्यानंतर तिची दबाई न झाल्याने चांगले रस्ते बकाल झाले मात्र ठेकेदारावर कारवाईचे पालिकेने धाडस दाखवले नाही. ’तुम्ही बोलल्यासारखे करा, आम्ही मारल्यासारखे करू’ असा एकूणच प्रकार शहरात सुरू आहे.

आमदारांच्या तक्रारीची दखल
नोव्हेंबर 2017 पासून शहरात केंद्र शासनाच्या महत्वांकाक्षी योजना असलेल्या अमृत योजनेच्या प्रकल्पाचे अवघे 37 टक्के काम झाल्याने आमदार संजय सावकारे यांनी नगरविकास विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानुषंगाने नगरविकास विभागाचे सहसचिव पां.जो.जाधव यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना 7 ऑगस्टच्या पत्रान्वये तातडीने हा तिढा सोडवून योजनेच्या जळगावसह भुसावळातील बंद पडलेल्या कामांना गती देण्यासाठी कंत्राटदार, संबंधित विभाग व प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक घेवून कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षानंतरही अवघे 37 टक्के काम
जळगावसह भुसावळातील अमृत योजनेचे काम जळगावच्या जैन एरीगेशन कंपनीने घेतले आहे मात्र नोव्हेंबर 2017 नंतरही एकूणच भौतीक योजनेचे अवघे 37 टक्के काम पूर्ण झाले आहे तर शहरातील 12 जलकुंभासह शहरात पाईप लाईन अंथरण्यात आल्यानंतर जेसीबीने दबाई करणे क्रमप्राप्त असतानाही ती न झाल्याने पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जळगावच्या नामांकीत कंपनीला काम दिल्यानंतरही दोन वर्षात केवळ 37 टक्के काम झाल्याने सत्ताधार्‍यांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे मात्र दुसरीकडे संबंधित कंत्राटदारावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.

शहरभर खोदले रस्ते ; आमदार संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, अमृत योजनेमुळे शहरभर रस्ते खोदण्यात आल्याने शहरवासीयांना त्याचा मनस्ताप होत आहे शिवाय नागरीकांच्या रोषाचा मलादेखील सामना करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराकडून वेळेवर काम पूर्ण झाले नसल्याने आता नगरसविकास सहसचिवांनी एमजीपीच्या सचिवांना बैठक घेण्याचे आदेश दिले असून लवकरच कामे मार्गी लागतील, असेही ते म्हणाले.

शासन आदेशामुळे रस्त्यांचे काम बंद -नगराध्यक्ष
अमृत योजना सुरू असलेल्या ठिकाणी पाईप लाईनचे काम होईस्तोवर रस्त्यांची कामे करू नये, असे शासनादेश आहेत. पावसामुळे डांबरी रस्त्यांना खड्डे पडले असून विशेष बाब म्हणून शहरातील रस्त्यांच्या कामांना परवानगी द्यावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करण्यात आल्याची नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. पाईप लाईन व जलकुंभाच आतापर्यंत 35 ते 40 टक्केच काम झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.