भुसावळात अवैध शिकवणी वर्ग जोमात

0

भारीप बहुजन महासंघाचा आंदोलनाचा इशारा

भुसावळ- शहरातील नामांकीत शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांसह प्राध्यापक खाजगीरीत्या शिकवणी घेत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. खाजगी शिकवणीच्या बाजाराला वेळीच आवर घालावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भारीप बहुजन महासंघाने दिला आहे. दरम्यान, या गंभीर इशार्‍याची शिक्षण विभागाने दखल घेतली असून पाच शाळांना पत्र बजावून शिक्षकांसह शाळांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

या शाळेतील शिक्षकांकडून शिकवणी
भारीपच्या निवेदनानुसर शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, सेंट अलॉयसीस हायस्कूल, प.क.कोटेचा कनिष्ठ महिला महाविद्यालय, पु.ओ.नाहाटा कनिष्ठ महाविद्यालय, डी.एल.हिंदी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक खाजगीरीत्या शिकवणी घेतात. शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम शाळेत न शिकवता विद्यार्थ्यांना शिकवणी लावण्यासाठी भाग पाडले जाते तर प्रसंगी नापास करण्याचीही धमकी दिली जाते. या प्रकारामुळे गोरगरीबांच्या पाल्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे. नामांकीत संस्थेत गलेलठ्ठ पगार घेणार्‍यांकडून हा प्रकार सुरू असल्याने वेळीच खाजगी शिकवण्या बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भारीपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.