भुसावळात एकाच दिवशी तीन कट्ट्यांसह आरोपी जाळ्यात

0

भुसावळ शहर पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेची धडक कारवाई

भुसावळ : भुसावळात गोपनीय माहितीवरून शहर पोलिसांसह जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन गावठी कट्टे जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शहर व बाजारपेठ पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, शहरात यापूर्वीदेखील महिनाभरात एकूण नऊ कट्टे पकडण्यात आल्याने शहर शस्त्र तस्करीचे जंक्शन तर नाही ना ? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. सातत्याने शहरात शस्त्र आढळलत असल्याने पोलिस प्रशासनाने याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे.

गुन्हे शाखेने पकडले दोन गावठी कट्टे
भुसावळ : शहरातील टिंबर मार्केटजवळ आलेल्या संशयीताकडे गावठी कट्टे असल्याची गोपनीय माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून आकाश गणेश राजपूत (नारायण नगर, भुसावळ) यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे जप्त करण्यात आले. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यातून देण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव, अरुण राजपूत आदींच्या पथकाने केली.

शहर पोलिसांनी पकडला गावठी कट्टा
भुसावळ : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून सात नंबर पोलिस चौकीच्या मागून संशयीत आरोपी प्रीतमसिंग जितेंद्र पाटील (25, रा.गणराया विहार, भुसावळ) याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचा गावठीचा जप्त केला. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, यापूर्वी आरोपीच्या वडिलांच्या ताब्यातून कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील, साहिल तडवी, संजीव पाटील, सुनील सैंदाणे, संजय बडगुजर, जितेंद्र सोनवणे, जुबेर शेख, विकास बाविस्कर, संजय ढाकणे यांनी केली.
विकास बाविस्कर यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.