भुसावळात किरकोळ कारणावरून वृद्धेवर चाकूहल्ला : आरोपीला अटक

0

भुसावळ- किरकोळ कारणावरून 55 वर्षीय वृद्धेवर चाकूहल्ला झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ घडली होती. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्यास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तक्रारदार अनि निचेनकी भोसले (21, रा.अकोला रेल्वे स्टेशन, अकोला) हा त्याची आई आसयानी व वडील निचेनकी भोसले यांच्यासोबत उदरनिर्वाहानिमित्त घोडेपीर बाबा दर्ग्याजवळील झोपडीत वास्तव्यास होते. संशयीत आरोपी व्यंकटेश बोधराज पवार (25, अंजनगाव, अमरावती) याने सोमवारी दारू पिवून वृद्ध दाम्पत्यास शिवीगाळ सुरू केल्याने त्याबाबत अनि भोसलेने जाब विचारल्याने आरोपीने संतापाच्या भरात आसयानी (55) यांच्या पोटात चाकू मारला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. या घटनेने बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला होता. सोमवारी रात्री उशिरा आरोपी व्यंकटेशविरुद्ध अनि भोसलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.