भुसावळात कुविख्यात गुन्हेगाराचा दोघांवर चाकू हल्ला

0

गुन्हेगारी वाढली ; आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू

भुसावळ- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सायलीवर किरकोळ कारणावरून कुविख्यात गुन्हेगाराने दोघांवर चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयीत पसार झाला असून बाजारपेठ पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, शहरात गुन्हेगारी वाढली असून पोलिसांकडून मात्र गुन्हेगारी ठेचण्याबाबत धडक कृती होत नसल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढतच असून यातून पुन्हा शहरात अप्रिय घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मोबाईल परत मागितल्याने केला चाकू हल्ला
हॉटेल सायलीवर तक्रारदार आशिष दिलीप जाधव (24, शिवाजी नगर, डी.एल.हिंदी विद्यालयाजवळ, भुसावळ) हे मित्र जॉय मॅथ्यू व भाऊ आकाश जाधव हे जेवण करीत असताना संशयीत आरोपी अजय गोडाले हा तेथे आला व त्याने जॉयच्या हातातील मोबाईल घेतला तो परत द्यावा, असे आशिषने म्हटल्याने आरोपी गोडालेने आपल्याजवळील चाकू डाव्या काखेत मारला. दोघांची झटापट सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आकाश जाधवच्या उजव्या हाताच्या कामेवरही दुखापत झाली. या घटनेनंतर संशयीत पसार झाला असून त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.
पोलीस दप्तरावरील कुविख्यात गुन्हेगार
आरोपी अजय गिरधारी गोडालेने 21 डिसेंबर 2017 रोजी रात्री 10.30 वाजता रूबाब झाडण्यासाठी शौचालयात लाईट दुरुस्तीचे काम करणार्‍या सचिन सोनवणे (25, रा.सावदा) या आपल्या सहकार्‍याच्या डाव्या हातावर गोळी झाडली होती तर शौचासाठी आलेल्या भाजीपाला व्यावसायीक दीपक गोपाळ काटकर (38, टींबर मार्केट, भुसावळ) यास  गावठी कट्ट्याचा धाक दाखवत त्यास मद्यप्राशन करण्यास भाग पाडले होते. या घटनेनंतर काटकर यास ओलीस ठेवत आरोपी अजय गोडाले, किसन पचेरवालसह जखमी सचिन सोनवणे व दीपक काटकर हे अ‍ॅक्टीव्हा दुचाकी (एम.एच.19 सी.टी.8891) ने जखमीला उपचारार्थ हलवण्यासाठी बाहेर निघाले. गावात पोलीस पकडतील म्हणून चारही जण एकाच दुचाकीवर वरणगावच्या दिशेने पळाले होते. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे तर एका खुनाच्या गुन्ह्यात अजय गोडालेची निर्दोष मुक्तता झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.