भुसावळात कोम्बिंगदरम्यान दगडफेक : तिघे हद्दपार आरोपी जाळ्यात

0

भुसावळ : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर भुसावळ विभागात पोलिस दलातर्फे गुन्हेगारांच्या धरपकडीसाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात भुसावळातील हद्दपार आरोपी बंटी व विष्णू पथरोडसह शम्मी चावरीया यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले तर पथरोड बंधूंच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिस दलावर आरोपींनी दगडफेक करीत शासकीय अडथळा आणण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी दगडफेकीची पर्वा न करता आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दुसर्‍या कारवाईत भुसावळ शहर पोलिसांनी नेपानगरसह भुसावळातील रेल्वेत चोरी करणार्‍या संशयीतांना अटक केली. आरोपींनी भोपाळमध्ये रेल्वेत चोरी केल्याची कबुली दिली तर भुसावळ तालुका पोलिसांनी वॉरंटवर गैरहजर राहणार्‍या तिघांना वॉरंट बजावले.

हद्दपारीचे उल्लंघण : तिघे आरोपी जाळ्यात
हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करताना शम्मी प्रल्हाद चावरीया (30, रा.अण्णाभाऊ साठे नगर, भुसावळ) हा शहरात आढळल्याने त्यास शुक्रवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. दरम्यान, वाल्मीक नगर परीसरात पोलिस ताफा हद्दपार आरोपींचा शोध घेत असताना बंटी परशुराम पथरोड (33, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) व विष्णू परशुराम पथरोड (22, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू करून शासकीय कामात त्यांनी अडथळा आणला. आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वॉरंटमधील आरोपी शेख आरीफ शेख इसा (रा.जाममोहल्ला, भुसावळ) यास देखील अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, हवालदार वाल्मिक सोनवणे, नाईक आत्माराम भालेराव, चंद्रकांत बोदडे, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, स्वाती सोळुंकी आदींनी केली.