भुसावळात गोळीबार ; भाजपा नगरसेवकासह पाच अटकेत

0 1

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्षपद निवडीचा वाद विकोपाला ; दोन गट भिडले ; 17 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हातुफान दगडफेकीत एक गंभीर, चारचाकीसह दुचाकीचे नुकसान ; तीन गोळ्या झाडल्या ; घटनास्थळावरून रीकामी पुंगळी पोलिसांकडून जप्त

भुसावळ- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद विकोपाला गेल्यानंतर समता नगरातील रहिवासी तथा पालिकेचे बांधकाम समिती सभापती व भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या घराबाहेर दोन गट भिडल्याने तुफान दगडफेक करण्यात आल्यानंतर खरात यांच्या चारचाकीसह अन्य एकाच्या दुचाकीचे नुकसान होवून एक जण जखमी झाला तर दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्ट्यातून तीन फैरी झाडण्यात आल्याने शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या दंगलीनंतर शहर पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. दरम्यान, नगरसेवक रवींद्र खरात, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल उर्फ बाळा डिगंबर सोनवणे, नरेंद्र उर्फ बाळा अरुण मोरे, गिरीश देविदास तायडे, शुभम रमेश कांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात पोलिस स्वतः फिर्यादी झाले असून 17 संशयीत आरोपींसह अन्य अनोळखी 10 ते 15 संशयीतांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दंगल, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अध्यक्ष निवडीवरून वाद ; मध्यरात्री भिडले दोन गट
भाजपा नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती रवींद्र खरात यांच्या समता नगर भागात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादानंतर दोन गट भिडल्याची माहिती कळताच सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे, संजय पाटील, मो.वली सैय्यद, साहिल तडवी, भूषण चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवून शांतता निर्माण केली. याप्रसंगी दोन गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आल्याने त्यात योगेश हिरालाल मोघे हा जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन गटाच्या दगडफेकीत खरात यांची चारचाकी (एम.एच.19 ए.डी.7777) च्या काचा फुटल्या तसेच शुभम रमेश कांबळे यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध दाखल केला गुन्हा
मध्यरात्री दोन गटात झालेल्या दंगलीनंतर शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात, नरेंद्र उर्फ बाळा मोरे, राहुल उर्फ बाळा सोनवणे, गिरीश तायडे, शुभम कांबळे, योगेश मोघे, नितीन मोरे, विकास गौंड, सोनू सपकाळे, विक्की मेश्राम (रा.कंडारी), राहुल सोनवणे, मुन्ना सोनवणेचा पुतण्या सुरेंद्र मेढे, हंसराज रवींद्र खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, गोलू खरात, आतीष खरात, पंकज खरात यांच्यासह अन्य अनोळखी 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपर पोलिस अधीक्षकांची धाव
भुसावळातील गोळीबार व दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, जळगाव पोलिस उपअधीक्षक निलाभ रोहन यांनी सोमवारी सकाळी शहर पोलिस ठाण्याला भेट देत गुन्ह्याची माहिती जाणून घेतली तसेच घटनास्थळावरून जावून नुकसानीबाबत माहिती घेतली. याप्रसंगी शहरचे प्रभारी निरीक्षक देविदास पवार उपस्थित होते.

पोलिस उलगडणार गुन्ह्याचे गुपीत -मतानी
अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी म्हणाले की, पोलिस या प्रकरणात स्वतः फिर्यादी झाले आहेत. तीन गोळ्या झाडल्याची बाब सांगितली जात असून एक रीकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे मात्र खरोखर गोळीबार झाला वा नाही याची शहानिशा सुरू असून रीकामी पुंगळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली जाणार आहे. 24 तासात आम्ही या प्रकरणातील सत्य बाहेर आणू त्यामुळे अधिक काही आता लागलीच सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.