भुसावळात ट्रक-दुचाकीचा अपघातात तरुण जागीच ठार

0

भुसावळातील नाहाटा चौफुलीजवळील घटना : अपघातग्रस्त ट्रकसह दुचाकी बाजारपेठ पोलिसांकडून जप्त

भुसावळ- भरधाव ट्रक व दुचाकीत समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नाहाटा चौफुलीजवळील सोना एजन्सीसमोर घडली. या अपघातात हर्षल संतोष सपकाळे (30, श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र केतन चौधरी (27, भुसावळ) हा जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. अपघाताचे वृत्त कळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत ट्रक व दुचाकी जप्त केली.

तरुण जागीच ठार तर मित्र जखमी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नाहाटा चौफुलीकडे विना क्रमांकाची केटीएम कंपनीची दुचाकी घेवून हर्षल सपकाळे व त्याचा मित्र केतन चौधरी (27, रा.श्रीनगर, भुसावळ) हे येत असताना जळगावकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक (क्र.एम.एच. 19 झेड. 9639) ची समोरा-समोर धडक झाली व हर्षल सपकाळे याच्या डोक्याला व पोटाला मार लागल्योन त्याचा जागीच मृत्यू झाला तर मित्र केतन चौधरी हा जखमी झाला. अपघाताची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच माजी नगरसेवक दीपक धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक पिंटु ठाकुर, दुर्गेश ठाकुर, सतीश सपकाळे आदींनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला तर जखमीला स्थानिक दवाखान्यात उपचारार्थ हलवले.

मृतदेह पाहताच पित्याने फोडला टाहो
अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक (क्र.एम.एच. 19 झेड. 9639) वरील चालक ललित दयाराम जाधव (28, नेरी नाका, जळगाव) याच्याविरुद्ध मयत तरुणाचा मामा किरण चावडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक करण्यात आली. अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक व अपघातग्रस्त दुचाकी बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, मयत तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे बाजारपेठ पोलिस ठाण्याबाहेर आणला असता मृताच्या वडिलांनी एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहताच टाहो फोडल्याने अनेकांना गहिवरून आले. मयत तरुणाच्या पश्‍चात आई, वडील व बहिण असा परीवार आहे.