भुसावळात धूम स्टाईल चोरी ; आरोपींची माहिती देणार्‍यांना पोलीस देणार बक्षीस

0

फुटेजवरून संशयीतांचा माग ; आरोपींनी जळगावातही चोरी केल्याची माहिती

भुसावळ- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी विवाहितेच्या गळ्याल सव्वा लाखांची पोत लांबवल्याची घटना गुरूवारी सकाळी 10.30 ते 10. 45 वाजेच्या सुमारास शहरातील विकास कॉलनीत घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी गुंगारा देण्यात यशस्वी ठरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फुटेज जारी केले असून त्यातील संशयीताची माहिती दिल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून संबंधितास बक्षीसही दिले जाणार असल्याची माहिती बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लांबवली पोत
शहरातील विकास कॉलनीतून पायी जाणार्या आशा भानुदास ठाकूर या विवाहितेजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघा युवकांनी अडवले. काही कळायच्या आत चोरट्यांनी पोत लांबवली. विना क्रमांकाच्या दुचाकीवरून चोरटे अलगद पसार झाल्याने विवाहिता काहीवेळ भांबावली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात आशा ठाकूर यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय आनंदसिंग पाटील करीत आहेत. दरम्यान, या संशयीतानी काही महिन्यांपूर्वी जळगावातही चोरी केल्याचा संशय आहे तर भुसावळातील फुटेजच्या आधारे नागरीकांना काही माहिती असल्यास त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याशी 02582-222399 या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून त्यास बक्षीसही देण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.