भुसावळात पिस्तुलाच्या धाकावर लुटले ; तिघांना अटक

0

भुसावळ- शहरातील दिनदयाल नगराजवळ शनिवारी रात्री 10.30 वाजता पाच जणांनी फायनान्स कर्मचार्‍यांना मारहाण करीत गावठी कट्ट्याचा धाक दाखवत त्यांच्याकडून सात हजार रूपयांची रोकड लांबवली होती. तक्रारदारांनी पोलिस ठाणे गाठल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी शोधमोहिम राबवत तिघांना अटक केली. तिघेही सराईत गुन्हेगार आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मनिष रूपेश ठाकरे व त्याचा मित्र हे खासगी फायनान्स कंपनीत असून ते कर्ज वसूलीसाठी दिनदयाल नगरात गेले होते. कर्जदार न मिळाल्याने ते परत येत असताना कुविख्यात तस्लीम उर्फ काल्या सलीम शेख, शेख वसीम शेख चाँद शेख व दीपक राजू पवार यांच्यासह पाच जणांनी दोघांना मारहाण करीत त्यांच्याजवळील पैसे हिसकावून धूम ठोकली होती. तक्रारदारांनी बाजारपेठ पेालिसात धाव घैतल्यानंतर याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अंबादास पाथरवट, दिपक जाधव, प्रशांत चव्हाण, सुनील थोरात, निलेश बाविस्कर, चेतन ढाकणे, उमाकांत पाटील, मंदार महाजन यांनी तिन्ही संशयीतांना नाहाटा कॉलेजजवळील पाण्याच्या टाकीजवळ पकडले. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या प्रकरणी मनिष ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

काल्याच्या आईविरूध्द गुन्हा
बाजारपेठ पोलिसांनी तिन्ही संशयीतांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तस्लीम उर्फ काल्या याची आई ताराबाई सलीम शेख यांनी पोलिस ठाण्यात येवून गोंधळ घालत माझ्या मुलास सोडून द्या नाही तर मी पोलिस ठाण्यात आत्महत्या करून घेईल, अशी धमकी दिली तर पोलिसांनी शांत राहण्यास सांगितले असता, पोलिसांवर ओरडू लागल्याने अश्विनी जोगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताराबाई शेख विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.