भुसावळात प्रार्थनास्थळाबाहेर फॅन्सिंग लावल्याने नागरीक संतप्त

0 1

शहर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमाव झाला शांत

भुसावळ- आरपीडी रस्त्यावरील पंजाबी मशीदीत जाण्यासाठी असलेल्या मार्गाबाहेरच रेल्वेतर्फे फॅन्सींग (लोखंडी सुरक्षा जाळी) लावली जात असल्याने संतप्त समाजबांधवांनी या प्रकाराला जोरदार आक्षेप घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर शहर पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाचे यार्ड निरीक्षक ज्ञानेश्‍वर पाटील, लोको निरीक्षक एस.के.पाठक, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर, उपनिरीक्षक जयश्री पाटील व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. याप्रसंगी समाजबांधवांनी प्रार्थनास्थळाच्या मार्गावरील जाळी लावल्यास नमाज अदा करण्यासाठी जायचे कसे? असे सांगत संताप व्यक्त केला. याप्रसंगी शिष्टमंडळाने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांची भेट घेवून कैफियत मांडली मात्र ही जागा रेल्वेची असल्याने त्याबाबत चर्चेतून तिढा सोडवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजबांधव मात्र रेल्वेच्या कृतीस विरोध करीत असल्याने ठोंबे यांनी घटनास्थळी जावून रेल्वे अधिकारी व संतप्त जमावाशी चर्चा केली. प्रार्थना स्थळात जाण्यासाठी मार्ग सोडण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर या वादावर पडदा पडला.