भुसावळात प्रेम प्रकरणातून तरुणावर चाकूहल्ला

0

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावरील घटना ; दोघा तरुणांना अटक ; जखमीवर गोदावरी रुग्णालयात उपचार ; गुन्ह्यातील चाकूसह गिटार पोलिसांकडून जप्त

भुसावळ- मित्राच्या बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधातून वाद उफाळल्याने शहरातील आनंद नगरातील रहिवासी असलेल्या 18 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर (डी.एस.ग्राऊंडवर) रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील संशयीत व आरोपी तीनही मित्र असून तिघांचा डी.एस.ग्राऊंडवरील पार्टीत वाद उफाळला व दोघा मित्रांनी आपल्याच मित्रावर चाकूने तब्बल 14 वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली. चाकू हल्ल्यातील जखमी जय अशोककुमार दुधाणी (18) तरुणावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

प्रेम संबंधावरून तरुणावर हल्ला
समजलेल्या माहितीनुसार, जय अशोककुमार दुधाणी (18, आनंद नगर, दीपक जावळे हॉस्पीटलमागे, भुसावळ) या तरुणाचे एका तरुणीशी असलेल्या प्रेम संबंधाच्या कारणावरून संशयीत आरोपी तर जयचे मित्र असलेल्या दत्तू जयसिंग राजपूत व निलेश चंद्रकांत ठाकूर यांनी त्याच्याशी रविवारी रात्री वाद घातला. आपल्या मित्राच्या बहिणीशी असलेले संबंध तोडावेत या कारणावरून उफाळलेल्या वादात संतापाच्या भरात आरोपींनी आपल्या जवळील चाकूने जयवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात जय गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी जयला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. रात्री उशिरा दत्तू राजपूत व निलेश ठाकूर यांना शहर पोलिसांनी अटक केली. दोघेही आरोपी पोलिसांच्या दप्तरी विविध गुन्हे दाखल असलेल्या निलेश राजपूत याचा भाचा व साला असल्याचे सांगण्यात आले.

दुचाकीवरून बसवत मैदानावर आणले
चाकू हल्ल्यातील जखमी व आरोपी हे तिघेही मित्र असून एका ठिकाणी वाढदिवस असल्याने आरोपींनी जयला त्याच्या घरातून दुचाकीवर बसवून नेले व रात्री तिघेही मित्र पार्टी करण्यासाठी डी.एस.ग्राऊंडवर जमले व पार्टीतच उभयंतांमध्ये वाद झाला. आरोपींनी आपल्याजवळील गिटार व चाकूने जयवर हल्ला चढवला. आरोपींनी तब्बल चाकूने 14 वार केल्याने जय रक्तबंबाळ झाला तर आरोपी हल्ल्यानंतर पसार झाले. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपींविरुद्ध नरेश अशोककुमार दुधाणी यांच्या फिर्यादीनुसार भादंवि 307, 326, 34 व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. जुन्या वादातून आरोपींनी हा चाकू हल्ल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रात्री उशिरा आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चाकू तसेच मारहाणीत वापरण्यात आलेली गिटार जप्त केल्याचे समजते. जळगाव येथील ठसे तज्ज्ञांनी सोमवारी गिटार तसेच चाकूवरील ठसे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.