भुसावळात भाजपा नगरसेवकाला लुटले : दोघांविरुद्ध गुन्हा

0

दुसर्‍या गटाचीही नगरसेवक किरण कोलतेंसह सहा जणांविरुद्ध शिवीगाळ केल्यासह दुचाकीवर दगडफेक केल्याची तक्रार

भुसावळ : शहरातील भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांना विनाकारण शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बाजारपेठ गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 23 रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली. या घटनेतील संशयीत आरोपी हा हद्दपार असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात दोनदा हद्दपारीचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. शहरात अनेक हद्दपार आरोपींचे राजरोस वास्तव्य असताना पोलिसांची भूमिकेविषयी मात्र आश्‍चर्य व संतापही व्यक्त होत आहे. दरम्यान, दुसर्‍या गटातर्फेही नगरसेवक कोलतेंसह सहा जणांविरुद्ध शिवीगाळ तसेच दुचाकीची नुकसान करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे. पहिल्या गटातर्फे नगरसेवक कोलते यांनी तक्रार दिली.

नगरसेवक कोलतेंना लुटले
कोलते हे गुरुवारी रात्री 12.15वाजता के.के.ब्रदर्स नावाचे हॉटेल बंद करून घराकडे निघाले असताना जामनेर रोडवरील हॉटेल हेवन समोर संशयीत आरोपी संजय लोटन चौधरी व प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) यांनी विनाकारण शिवीगाळ करीत खिशातील पाच हजार 700 रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी गुरुवारी पहाटे 5.50 वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

दुसर्‍या गटाचीही नगरसेवक कोलतेंसह सहा जणांविरुद्ध तक्रार
दुसर्‍या गटातर्फेही बांधकाम ठेकेदार संजय लोटन चौधरी (पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. शहरातील हॉटेल हेवनसमोर गाळ्याचे बांधकाम सुरू असताना तक्रारदाराला शिवीगाळ करीत तक्रारदाराच्या मुलासह त्याच्या भाच्याच्या दुचाकीवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी भाजपा नगरसेवक किरण कोलते यांच्यासह किशोर पाटील, मयूर कोलते, कल्पेश ढाके, किशोर पाटील, दीपा पैलवान (सर्व रा.भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल हेवनसमोर 23 रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तपास नाईक रमण सुरळकर करीत आहेत.