भुसावळात रीक्षांची तोडफोड ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- टवाळखोरांचा रीक्षा चालकांशी झालेल्या वादानंतर रेल्वे स्थानकाबाहेरील बसस्थानकाजवळ उभ्या असलेल्या सहा ते सात रीक्षांच्या टवाळखोरांनी काचा फोडल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने रीक्षा चालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टवाळखोरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी रीक्षा चालकांनी केली आहे.

चौघा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा
रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास काही टवाळखोरांनी बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रीक्षांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली तर या घटनेने रीक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली. बाजारपेठ पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत टवाळखोर पसार झाले. या घटनेप्रकरणी सोमवारी पहाटे तीन वाजता पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत दिनकर चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी आफत पटेल (जाम मोहल्ला, भुसावळ), बाबर काल्या, गुड्डू व सोहेब (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी बसस्थानकाजवळ आपसात मारामारी करीत अब्दुल सलाम अ.वहिद, शेख मतीन शेख अताउल्ला, शफी सत्तार पिंजारी यांना मारहाण करीत रीक्षाच्या काचा फोडल्याचे तक्रारीत नमूद आहे.