भुसावळात विस्थापितांना नागरी सुविधा द्या

0

लोकसंघर्ष मोर्चाची मागणी : ‘नही’ च्या प्रकल्प संचालकांना निवेदन

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणात दीनदयाल नगरातील काही भागाचा समावेश असून विस्थापित होणार्‍या क्षेत्राची मोजणी करावी तसेच विस्थापित होणार्‍या कस्तुरबा गांधी नगराची उभारणी करून तेथे कंपनीकडून नागरी सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चातर्फे निवेदनाद्वारे ‘नही’ चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे करण्यात आली.

50 वर्षांपासून विस्थापीतांची वहिवाट
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी काम करणारी कंपनी जागेचे संपादन करीत आहे. दीनदयाल नगरातील नगरपालिका दवाखान्याचा परीसर 1967 मध्ये पालिकेने ठरावाद्वारे भारत मिलच्या विस्थापितांना पुनर्वसनासाठी दिला आहे. त्या जागेवर गेल्या 50 वर्षापासून विस्थापितांची वहिवाट आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्‍वर राजूरकर व महामार्गाचे अधिकारी यांनी भेट देऊन विस्थापितांचे परत विस्थापन होऊ नये म्हणून आदेश दिले होते त्यामुळे भूमी अभिलेख मार्फत जागेची मोजणी करून मिळावी तसेच मूल्यांकन करावे. संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रातील दीनदयाल नगर येथे वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याबाबतचा प्रस्ताव कार्यालयात मे 2018 पासून प्रलंबित आहे, त्याचा त्वरीत निपटारा करावा. एप्रिल 2020 पर्यंत परीक्षा झाल्यावर या भागातील चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात करावी, तोपर्यंत दक्षिणेकडील महाविद्यालयाकडून काम करावे. चौपदरीकरणात जाणार्‍या संस्थेच्या जमिनीचा ग्रामोद्योग, एस.टी.महामंडळ यांना मिळणार्‍या मोबदल्यातून तसेच राहिलेल्या जागेवर वास्तू उभी करावी, महामार्ग चौपदरीकरणात शहीद राकेश शिंदे स्मारक, पालिका दवाखाना, पोलिस चौकी, बस थांबा, ऑटो रीक्षा थांबा जात आहे. यांची उभारणी कंपनीकडून करून घ्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी निवेदन देताना लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी, सचिन धांडे, सीमा चौधरी, वैशाली ठाकूर, सुनीता मेढे, आरती जोहरी, बेबाबाई कळसकर आदी उपस्थित होते.