भुसावळात वृद्धापकाळ योजनेच्या 621 प्रकरणांना मंजुरी

0

भुसावळ- संजय गांधी योजना समितीची शहरातील तहसील कार्यालयात बुधवारी बैठक झाली. त्यात वृद्धापकाळ योजनेच्या 745 पैकी 621 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. त्यात शहरी भागातील 374 तर ग्रामीण भागातील 247 प्रकरणांचा समावेश आहे. संजय गांधी योजना समितीचे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. प्रभारी तहसीलदार संजय तायडे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार सतीश निकम, एम.बी.सपकाळे, एस.आर.दुसाने, अनिल वानखेडे, दीपाली बोरसे यांच्यासह योजनेचे सदस्य भालचंद्र पाटील, बाळू पारधी, प्रदीप भारंबे उपस्थित होते.

मंजूर प्रकरणातील लाभार्थीना लवकरच लाभ
शहरी भागात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेच्या माध्यमातून विधवा व अपंगांची 374 प्रकरणे प्राप्त झाली.त्यातील 60 प्रकरणे नामंजूर झाली. ग्रामीण भागातील 274 प्रकरणे मंजूर व 64 नामंजूर करण्यात आली. प्रकरणे मंजूर झालेल्या लाभार्थींकडून आवश्यक कागदपत्रे संकलित करून त्यांना लाभ देण्यास सुरुवात होईल, असे नायब तहसीलदार सतीश निकम म्हणाले. पात्र लोकांना लाभ मिळावा यासाठी तलाठी, मंडळाधिकार्‍यांनी नागरिकांना सहकार्य करावे, असे तहसीलदार तायडे यांनी सांगितले.

या प्रकरणांना मिळाली मंजुरी
ग्रामीण भागात श्रावणबाळ योजनेची 111, संजय गांधी योजनेची 100, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची 20, तर विधवा महिलांची 16 असे एकुण 247 आणि शहरी भागासाठी श्रावणबाळ योजनेचे 184, संजय गांधी योजनेचे 167, वृद्धापकाळ योजनेचे 11 आणि विधवा महिलांची 12 अशी 374 प्रकरणे समितीने मंजूर केली.