भुसावळात वॉण्टेडसह संशयीत आरोपी जाळ्यात

0

उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणार्‍या चौघांवर कारवाईचा बडगा ; सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अलर्ट : पोलिसांच्या कोम्बिंगने गुन्हेगारांमध्ये उडाली खळबळ

भुसावळ- शहरात सातत्याने सुरू असलेल्या चोर्‍या-घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर 2 व 3 रोजी सलग शहरात पोलिसांतर्फे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलिसांच्या कारवाईत चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या एका संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर वॉण्टेड दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणार्‍या चौघा दुकानदारांवरही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली.

तीन पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत कोम्बिंग
डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे आणि तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सोमवारी रात्री 12 ते पहाटे तीन वाजेपर्यत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाम मोहल्ला, दिनदयाल नगर, वाल्मीक नगर, सिंधी कॉलनी भागात कोम्बिंग राबवण्यात आले. गुन्हेगारांच्या घरांची तपासणी करण्यात आली. यात सिंधी कॉलनीत रात्री उशीरापर्यत सुरू असलेल्या दुकानासह शहरातील जाम मोहल्ला भाग, रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक देविदास पवार, सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे, उपनिरीक्षक मनोज ठाकरे यांच्यासह डीबी कर्मचारी व पोलिस कोम्बिंगमध्ये सहभागी झाले.

एक संशयीत जाळ्यात
शहरातील मॉडर्न रोडवरील एका दुकानाच्या आड पोलिसांना पाहून लपलेल्या निरज लक्ष्मी नारायण अहिलेकर (रा. पंधरा बंगला, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून लोखंडी टॉमी जप्त करण्यात आली. पोलिस विकास सातदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही कारवाई युवराज नागरूत, विकास सातदिवे यांनी केली.

दोन वॉण्डेड जाळ्यात
तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील पसार असलेल्या हर्षल चौधरी (रा. कपिलवस्ती, दिपनगर) व बापू ब्राम्हणे (रा. फुलगाव, ता. भुसावळ) यांना अटक केली. तसेच दोन जणांचे अटक वॉरंट बजावले.हिस्ट्रीसीटरांची तपासणी केली. त्यात चार घरी मिळून आले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी त्याच्या कार्यक्षेत्रातील आगवाली चाळ, हद्दिवाली चाळ, कंडारी, कवाडे नगर, डॉ. आंबेडकर नगर आदी ठिकाणी तपासणी केली मात्र कुणीही गुन्हेगार त्यांना मिळाले नाही.