भुसावळात 16 व 17 रोजी राज्यस्तरीय ‘स्नेहयात्री करंडक’ एकांकिका स्पर्धा

0

राज्यातील 16 संघ सादर करणार कलाकृती ; सांस्कृतिक व नाट्य चळवळीतील सर्वात मोठी स्पर्धा

भुसावळ- शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक व नाट्य चळवळीला चालना देण्यासाठी 16 व 17 रोजी स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील 16 संघ आपल्या कलाकृती भुसावळकरांसमोर सादर करणार असून स्पर्धेच्या रंगमंचाला स्व.निखील खडसे यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परीषदेत स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी दिली.

राज्यभरातील 16 संघांचा स्पर्धेत सहभाग
यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून स्नेहयात्री करंडक स्पर्धेसाठी मुंबईचे चार, नाशिकचे तीन, धुळे व जळगांवचे प्रत्येकी दोन तर नागपूर, पुणे, चंद्रपूर, वर्ध्याचे प्रत्येकी एक संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील जवळपास 200 तरुण कलावंत व तत्रंज्ञ प्रत्यक्ष रंगमंचावर आपली नाट्यकृती सादर करणार आहेत.
परीक्षक म्हणून नाट्य व मालिका कलावंत तसेच मुंबई येथील नाट्यलेखक व अभिनेते प्रसाद दाणी, अहमदनगर येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रवीण कुलकर्णी लाभणार आहेत.

45 हजाराची रोख बक्षीसे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे
प्रकाश योजनेसाठी तीन हजाराची एकूण तीन बक्षिसे स्व.अजय वानरे यांच्या स्मरणार्थ कु.अक्षया वानरे यांच्याकडून, नेपथ्यासाठी तीन हजाराची एकूण तीन बक्षीसे स्व.भाईदास शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ क्रेझी क्रिएशन्स् यांच्याकडून, पुरुष-अभिनयाचे प्रथम बक्षीस स्व.गिरधर रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ बालाजी स्टील यांच्याकडून तीन हजार पाचशे, पुरुष-अभिनयाचे दुसरे बक्षीस प्रज्ञासुर्य प्रतिष्ठानचे प्रा.जतीन मेढे यांच्याकडून दोन हजार, तर पुरुष अभिनयाचे तिसरे बक्षीस स्व. सुमन पंढरीनाथ भालेराव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रंगकर्मी रमाकांत भालेराव यांच्याकडून एक हजार तसेच स्त्री-अभिनयाचे पहिले बक्षीस स्व.रामचंद्र कौतिक घुले यांच्या स्मरणार्थ विश्‍वजीत घुले यांच्याकडून तीन हजार पाचशे, दुसरे बक्षीस नेहा एज्युफिनचे संचालक प्रा.गिरीष कुलकर्णी यांच्याकडून दोन हजार तर तिसरे बक्षीस हिटलर डेनीमचे संचालक प्रा.अनंत भिडे यांच्याकडून एक हजारचे बक्षीस दिले जाणार आहे.त्याचप्रमाणे दिग्दर्शनाचे प्रथम बक्षीस प्रज्ञासुर्य प्रतिष्ठानचे प्रा.जतीन मेढे यांच्याकडून तीन हजार पाचशे, दुसरे बक्षीस नेहा एज्युफिनचे संचालक प्रा.गिरीष कुलकर्णी यांच्याकडून दोन हजार तर तिसरे बक्षीस हिटलर डेनीमचे संचालक प्रा.अनंत भिडे यांच्याकडून रुपये एक हजारचे बक्षीस दिले जाणार आहे. वैयक्तीक बक्षीसांप्रमाणेच सांघिक बक्षीसे सुध्दा दिली जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी प्रथम बक्षीस स्व.लालचंद लखीचंदजी निमाणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे रवीजी निमाणी यांच्याकडून रुपये बारा हजाराचे, व्दितीय एकांकिकेस गोदावरी फाऊंडेशनतर्फे डॉ.उल्हास पाटील यांच्याकडून आठ हजारांचे तर तृतीय एकांकिकेस न्यु जवाहर डेअरीचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडून पाच हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहेत.

16 रोजी नगराध्यक्षांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे शनिवार, 16 रोजी सकाळी 10 वाजता नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याहस्ते उद्घाटन होईल. प्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, जळगांवचे रंगकर्मी हर्षल पाटील, उद्योजक विश्‍वनाथ अग्रवाल, प्रा.जतीन मेढे, एनआरएमयुचे मंडळ सचिव आर.आर.निकम, ज्येष्ठ नागरीक संघाचे अरुण मांडळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुकेश खपली यांच्या सांस्कृतिक कला निकेतनतर्फे नांदीच्या सादरीकरणाने स्पर्धेला सुरुवात होईल.

17 रोजी स्पर्धेचा समारोप
दोन दिवसीय स्पर्धेचा रविवार, 17 रोजी रात्री आठ वाजता समारोप व पारीतोषिक वितरण सोहळा होईल. प्रसंगी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, भुसावळचे आमदार संजय सावकारे, भाजपाचे संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष व नगरसेवक युवराज लोणारी, एनआरएमयुचे मंडळ अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, विघ्नहर्ता पब्लिकेशन्सचे रवी निमाणी, प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक उमेशजी घुले तसेच युवा उद्योजक चंद्रशेखर अग्रवाल यांची उपस्थिती असेल.

या एकांकिकांचे होणार सादरीकरण
शनिवार, 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजता नाट्यरंग, जळगावची ‘एन्डोसल्फान’, दुपारी 1.30 वाजता सौंदर्यनिर्मिती नाशिकची ‘पाऊसपाड्या’, दुपारी 2.30 वाजता लोकमंगल कलाविष्कार, धुळे संस्थेची ‘नेकी’, दुपारी 3.30 वाजता भुमि बहुउद्देशीय संस्था, जळगांवची ‘मिस्टर विसरभोळे’, संध्याकाळी 5 वाजता नुतन मराठा महाविद्यालय, जळगांवची ‘हलगी सम्राट’, संध्याकाळी सहा वाजता डीडीके थिएटर, मुंबईची ‘सारीपाट’, संध्या. सात वाजता सिध्दांत बहुउद्देशीय संस्था, धुळे यांची ‘यज्ञाहुती’, रात्री आठ वाजता सहयोगी कलावंत, वर्ध्याची ‘स्वप्न’ या एकांकिका सादर होणार आहेत तर दुसर्‍या दिवशी रविवार, 17 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता आराध्या संस्था मुंबईची ‘पुर्णविराम’, सकाळी 10.30 वाजता आर्ट लॅब, नागपूरची ‘अनोळखी ओळ’, सकाळी 11.30 वाजता नवोदिता संस्था, चंद्रपूरची ‘नथिंग टू से’ दुपारी 1.30 वाजता डेडीकेटेड थिएटर, नाशिकची ‘एव्हरी डे इज संडे’, दुपारी 2.30 वाजता रियाज, मुंबईची ‘कारवाँ’, दुपारी 3.30 वाजता नादश्री नाट्यकर्मी, पुण्याची ‘कन्सल्टंट’, संध्याकाळी 5 वाजता स्वामी नाट्यांगण, डोंबीवलीची ‘बिफोर द लाईन’ व संध्याकाळी 6 वाजता नाशिकच्या नाट्यसेवा संस्थेच्या ‘तो, ती आणि नाटक’ या एकांकिकेने स्पर्धेचा समारोप होईल. स्पर्धा निकालाच्या संध्या 7 ते 8 या अवधीत नृत्य, गीत व मिमिक्रीचा बहारदार कार्यक्रम ‘स्नेहरंग’ सादर होईल. सदर कार्यक्रमात सांस्कृतिक कला निकेतन, भुसावळ आणि संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण करतील.

स्पर्धा यशस्वतीतेसाठी यांचे परीश्रम
स्नेहयात्री करंडकाच्या यशस्वीतेसाठी स्नेहयात्री प्रतिष्ठानचे सचिव विश्‍वजीत घुले, उपाध्यक्ष मुकेश खपली, नारायण माळी, प्रा.गिरीष कुलकर्णी, तुषार जोशी, धनराज कुंवर, रोहन माळी, राजेश पाटील, संजय यावलकर, संजीवनी यावलकर, मुकूंद महाजन, प्रशांत पाटील, अजय पाटील, हरीष कोळी, विशाल खोलगडे, सुमित पाचपांडे, अभिषेक सोनवणे, मानसी पाटील, रितेश वानखडे, खुशाल निंबाळे, अभिषेक लोखंडे, पंकज परदेशी, आदर्श पांड्या, प्रदिप चौधरी आदी सदस्य परीश्रम घेत आहेत. दरम्यान, पत्रकार परीषदेला सचिव विश्‍वजीत घुले, उपाध्यक्ष मुकेश खपली, नारायण माळी, तुषार जोशी आदींची उपस्थिती होती.