भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने मोबाईल केला परत

0

चोरट्याला अटक : हरीद्वार एक्स्प्रेसमधून 89 हजारांच्या मोबाईलची झाली होती चोरी

भुसावळ : 12171 डाऊन एलटीटी-हरीद्वार एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक ए वनवरील बर्थ क्रमांक 49 वरून भुसावळ ते दिल्ली प्रवास करणार्‍या प्रवाशाचा 89 हजार रुपये किंमतीचा अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना 16 जानेवारी 2020 रोजी घडली होती. या प्रकरणी संशयीत आरोपी मंगेश महादेवराव बोंद्रे (29, कुरझडी, ता.देवळी, जि.वर्धा) यास बडनेरा रेल्वे स्थानकावरून लोहमार्ग पोलिसांनी अटक करीत मोबाईल जप्त केला होता. रेल्वे न्यायालयाच्या आदेशानंतर तो शुक्रवारी तक्रारदारास परत करण्यात आला. तक्रारदार राजेंद्र सदाशीव भोसले (56, आठवडे बाजार, खामगाव) हे भुसावळ ते दिल्ली असा प्रवास करीत असताना त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावून ते बेसिनमध्ये हात धुण्यासाठी गेल्याची संधी साधून चोरट्याने मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली होती. शुक्रवारी रेल्वे न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदाराला पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत मोबाईल परत करण्यात आला.