भुसावळ विभागात शिव जयंतीचा उत्साह

0 1

भुसावळात दुचाकी रॅली ; रात्री उशिरापर्यंत चालल्या मिरवणुका

भुसावळ- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) भुसावळ शहर व विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भुसावळात शनिवारी सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली तर ठिकठिकाणी सायंकाळी जल्लोषात सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा उत्साह कायम होता. ढोल-ताशांसह पारंपरीक वाद्यांच्या गजरावर तरुणाईने नृत्य करीत जल्लोष केला.

भुसावळात दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
शहरातील गडकरी नगरातील नवनिर्माण मंडळ संचलित शंभू राजे ग्रुपतर्फे सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली गांधी नगर, शिवाजी नगरातून जुन्या पालिकेसमोर आल्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रॅली सराफ बाजार, अप्सरा चौक, अष्टभूजा चौक, नाहाटा चौफुलीवर आल्यानंतर पुन्हा माघारी परतली. पांडुरंग टॉकीजमागील छत्रपतींच्या पुतळ्याला याप्रसंगी माल्यार्पण करण्यात आल्यानंतर रॅली बाजारपेठ पोलिस ठाणे व तेथून रेल्वे स्थानकाबाहेरील छत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्याजवळ आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. रॅलीत आमदार संजय सावकारे, नगरसेवक निर्मल कोठारी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुकेश गुंजाळ, प्रमोद नेमाडे, प्रमोद सावकारे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक वसंत पाटील, दीपक धांडे, रजनी सावकारे, विनीता नेवे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील, शिव कैथवास, राकेश ठाकरे, किशेार टोके, लाजरथ मणी, चेतन दांबट, खुशाल महाजन, गौरव आवटे आदी सहभागी झाले. माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या रॅलीत 200 दुचाकीस्वार सहभागी झाले.

फैजपूरला शिवजयंतीनिमित्त मिरवणूक
फैजपूर- शिवजयंतीनिमित्त अतिशय शांततेत व उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी नगर भागातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. तत्पूर्वी खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा महानंदा होले, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, पी.के.चौधरी, माजी नगरसेवक अप्पा चौधरी, भुसावळ येथील नगरसेवक सुनील नेवे, तसेच भरत महाजन, रोशन राणे, प्रभाकर चौधरी, संजय रल, राकेश जैन, दीपक होले, आकाश चौधरी, राजू काठोके, संजय तेली यांच्यासह जयश्री चौधरी, रजनी चौधरी, योगीता मंडवाले यांची उपस्थिती होती. मिरवणुकीचा रात्री सुभाष चौकात समारोप झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आधार निकुंभे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.