भोसरीत अमोल कोल्हेंच्या विरोधात प्रचंड असंतोष

0

आमची ताकद दाखविणार, अमोल कोल्हेंना पाडणार

विलास लांडे समर्थकांकडून ‘फलकबाजी’

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर लोकसभेची उमेदवारी डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर केली आहे. मात्र कोल्हेंच्या विरोधात प्रचंड असंतोष पहायला मिळत आहे. भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांकडून कोल्हे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करणारे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. त्यातून असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये ‘दुफळी’ निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

लांडेंच्या तयारीवर फिरले पाणी 
शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे तीव्र इच्छुक होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली होती. संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटीही लांडे यांनी वाढवल्या होत्या. मात्र अचानकपणे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. कोल्हे यांच्या प्रवेशानंतर लांडे यांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आणि झालं ही तसचं, शुक्रवारी पक्षाने अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करत लांडे यांना मोठा धक्का दिला. त्यामुळे विलास लांडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

नाराजीचा कोल्हेंंना बसू शकतो फटका 
सोशल मिडीयावर तसे नाराजी, असंतोषाचे मॅसेज व्हायरल होत आहेत. त्यात आता फ्लेक्सबाजीची भर पडली आहे. भोसरी परिसरात लांडे समर्थकांनी कोल्हेंच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत फ्लेक्स लावले आहेत. विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीच्या चिन्हावर फुली देखील मारण्यापर्यंत समर्थकांची मजल गेली आहे. आता सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार याकडे कशा पध्दतीने मध्यस्थी करत विलास लांडे आणि समर्थकांची मनधरणी करतात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. कारण लांडेंची नाराजी कायम राहिली, तर पक्षाला म्हणजेच अमोल कोल्हे यांना निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसू शकतो.

काय आहे फ्लेक्समध्ये 
अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार.. आम्ही त्याला आमची ताकद दाखवणार.. लांडे साहेबांनी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली.. पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार.. कोल्हेला पाडणार..! तळमळीचा कार्यकर्ता.. सागर डुंबरे